नाशिक विभागातही चमकल्या विद्यार्थिनी...!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

गुणपडताळणीसाठी संकेतस्थळावरील गुणपत्रिकेच्या स्वयंसाक्षांकित प्रतीसह 23 जूनपर्यंत शुल्क भरून अर्ज करता येईल. तर छायाप्रतीसाठी 3 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे

नाशिक - इयत्ता दहावीच्या आज जाहीर झालेल्या निकालात नाशिक विभागातून मुलींनी बाजी मारली आहे. विभागातून 79 हजार 922 पैकी 88 हजार 126 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून हे प्रमाण 90.69 टक्‍के इतके आहे. तर 1 लाख 14 हजार 352 मुलांपैकी 97 हजार 771 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हे प्रमाण 85.50 टक्‍के आहे. नाशिक विभागाचा निकाल 87.76 टक्‍के असून चारही जिल्ह्यात धुळे (89.79 टक्‍के) विभागात अव्वल स्थानी आहे. निकाल जाहीर होताच विद्यार्थी-पालकांनी पेढे भरवत जल्लोष केला. 

नाशिक विभागांतर्गत नाशिक जिल्ह्याचा निकाल 87.42 टक्‍के, धुळे 89.79 टक्‍के, जळगाव 87.78 टक्‍के, नंदुरबार 86.38 टक्‍के इतका लागला आहे. विभागातून 2 लाख 02 हजार 478 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 1 लाख 77 हजार 693 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागातून 46 हजार 864 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीतून उत्तीर्ण झाले असून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 77 हजार 573 इतकी आहे. या परीक्षा कालावधीत नाशिक जिल्ह्यात 42, धुळे 41, जळगावला सर्वाधिक 50 तर नंदुरबारला 1 गैरप्रकार झाल्याची नोंद आहे. या 134 विद्यार्थ्यांना मंडळ शिक्षासूची नुसार शास्ती करण्यात आली आहे. 

गुणपडताळणीसाठी 23पर्यंत मुदत 
उद्या (ता.14) पासून गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गुणपडताळणीसाठी संकेतस्थळावरील गुणपत्रिकेच्या स्वयंसाक्षांकित प्रतीसह 23 जूनपर्यंत शुल्क भरून अर्ज करता येईल. तर छायाप्रतीसाठी 3 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. जुलै-ऑगस्ट 2017मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी 19 जूनपासून ऑनलाईन स्वरूपात अर्ज भरता येतील. 

"एटीकेटी'सह अकरावी प्रवेशाची संधी 
कमाल दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 2017-18 या शैक्षणिक वर्षासाठी एटीकेटीची सुविधा लागू राहील. या सवलतीमुळे असे विद्यार्थी इयत्ता अकरावीला प्रवेश हा तात्पुरत्या स्वरूपात असेल. अकरावीत शिकत असतांना एटीकेटी मिळालेला विषय घेऊन जुलै-ऑगस्ट 2017मध्ये होणाऱ्या मंडळाच्या परीक्षेस प्रविष्ठ होता येईल. या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास मात्र त्याचा अकरावीचा निकाल दहावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच जाहीर करण्यात येईल.

Web Title: SSC results in Nashik