राज्य महिला आयोग सुना सुना!

राहुल जगताप
सोमवार, 24 जून 2019

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना त्यांच्या कामाची दखल घेत तीन वर्षे मुदतवाढ मिळाली आहे. तथापि, नऊ फेब्रुवारीला आयोगाच्या पाच महिला सदस्यांची मुदत संपूनही नियुक्ती झालेली नाही. नवीन सदस्यांच्या निवडीकडे महिलावर्गाचे लक्ष लागले आहे.

नंदुरबार - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना त्यांच्या कामाची दखल घेत तीन वर्षे मुदतवाढ मिळाली आहे. तथापि, नऊ फेब्रुवारीला आयोगाच्या पाच महिला सदस्यांची मुदत संपूनही नियुक्ती झालेली नाही. नवीन सदस्यांच्या निवडीकडे महिलावर्गाचे लक्ष लागले आहे.

तब्बल चार महिन्यांपासून राज्य महिला आयोगाचे काम सदस्यांविना सुरू आहे. सदस्य नसल्याने पीडित महिलांच्या दाव्यांवरील कामकाजावर परिणाम होत आहे. गेल्या वेळी आयोगाच्या अध्यक्षा आणि पाच महिला सदस्यांची निवड ही न्यायालयाच्या आदेशाने केली होती. त्यात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, सदस्या दया कराड, नीता ठाकरे, विंदा कीर्तिकर, ऍड. आशा लांडगे आणि देवयानी ठाकरे, अशा पाच सदस्यांची निवड केली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाचे अध्यक्ष व सदस्यपद केवळ मुंबईत ठेवले नाही, तर राज्यातील प्रत्येक भागातून सदस्यांची निवड केली. त्यामुळे महिला आयोगाचे काम राज्यात सर्वदूर पसरले. अगदी नंदुरबारच्या दुर्गम भागापर्यंत हे काम पोचले. आयोगाच्या बांद्रा येथील मुख्य कार्यालयात दर बुधवारी व गुरुवारी पीडित महिलांच्या दाव्यांवर कामकाज होत होते. अनेक महत्त्वपूर्ण निकाल होत असत. त्यामुळे पीडित महिलांना न्याय मिळत होता.

गेल्या तीन वर्षांत राज्य महिला आयोगाने आपल्या कामातून महिलांमध्ये नवीन उमेद निर्माण केली. महिला बोलू लागल्या. आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची तक्रार महिला आयोगाकडे करीत आहेत. या सर्व प्रक्रियेत आयोगाच्या सदस्यांची भूमिका महत्त्वाची होती.

देवयानी ठाकरे माजी सदस्या
नंदुरबार जिल्ह्यात नुकताच प्रज्वला योजनेसंदर्भात महिला गटांचा कार्यक्रम झाला. त्याला अध्यक्षा विजया रहाटकर उपस्थित होत्या. त्यात आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे यांचा उल्लेख माजी सदस्य म्हणून करण्यात आला. त्यामुळे नवीन सदस्य कोण आहेत, याचा शोध घेतला असता ही माहिती समोर आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Women Commission Vijaya Rahatkar