Stray Dog Attack : कुत्र्याने चावा घेतल्यामुळे तरुणाचा मृत्य; बालक गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Stray Dog

Stray Dog Attack : कुत्र्याने चावा घेतल्यामुळे तरुणाचा मृत्य; बालक गंभीर

शिरपूर : पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या युवकाचा मंगळवारी (ता. ३) मृत्यू झाला. ग्यारसीलाल ताराचंद पावरा (वय २४) असे मृताचे नाव असून, तो हिंगोणीपाडा (ता. शिरपूर) येथील रहिवासी आहे. त्याच गावात श्वानदंश झालेल्या सुशील सखाराम पावरा (वय १०) या बालकाची प्रकृतीही गंभीर असून, त्याला धुळे येथे रवाना करण्यात आले.

हेही वाचा: Dogs Blood : माणसांपेक्षा कुत्र्यांचं रक्त विकलं जातंय महाग, जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण?

ग्यारसीलाल व सुशील या दोघांनाही सुमारे महिनाभरापूर्वी गावातील पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्यानंतर दोघांना धुळे येथे नेऊन शासकीय रुग्णालयातून अँटिरेबीज लस देण्यात आली. उपचार घेऊन ते गावी परतले. मात्र त्यांच्या नातलगांच्या म्हणण्यानुसार, उपचार घेतल्यानंतरही ग्यारसीलाल पूर्ववत होऊ शकला नव्हता.

तो घरात पडून होता. तीन दिवसांपासून त्याला झटके येणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे जाणवत होती. मंगळवारी त्याची अवस्था गंभीर झाल्याने नातलग शिरपूरला घेऊन येत होते. मात्र त्याचे वाटेतच त्याचे निधन झाले. नातलगांनी त्याला उपजिल्हा रुग्णालयाऐवजी खासगी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरने त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केल्यानंतर मृतदेह घेऊन ते गावी निघून गेले. बुधवारी (ता. ४) त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा: Rules for Stray Dogs: नागपूरकरांच्या श्वानप्रेमावर उच्च न्यायालयाची बंधनं; पाळाव्या लागणार नियम-अटी

सुशील पावरा या बालकालाही काही दिवसांपासून त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृती गंभीर झाल्याने त्याला मंगळवारी धुळे येथे रवाना करण्यात आले. ग्यारसीलाल व सुशील यांना चावा घेणाऱ्या श्वानाने त्याच रात्री गावातील एका म्हशीलाही चावा घेतला होता. तिचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

श्वानदंशाने मृत्यू होण्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे. ग्यारसीलालच्या मृतदेहाची परस्पर नेऊन विल्हेवाट लावल्यामुळे शवविच्छेदन होऊ शकले नाही. त्यामुळे त्याच्या मृत्यूचे कारण समजण्यास अनेक अडचणी आहेत.

त्याने योग्य उपचार घेतले नाहीत की त्याला प्रभावी उपचार मिळाले नाहीत, लस घेतल्यानंतरही त्याचा मृत्यू होण्याइतपत परिस्थिती गंभीर का झाली, घरातील अन्य कोणाला त्याच्यापासून उपद्रव झाला का, मृताला हायड्रोफोबिया होता किंवा नाही याची माहिती आता त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आणि तर्काद्वारेच मिळू शकणार आहे.

हेही वाचा: Dog Funny Viral Video : महिला निघाली कुत्र्याला फिरवायला, पण कुत्र्यानंच तिला फिरवलं, पाहा व्हिडीओ

''मृत ग्यारसीलाल पावरा याच्या घरी आरोग्य विभागाचे स्वतंत्र पथक पाठविण्यात येणार आहे. त्याला झालेला श्वानदंश, उपचार यांचा तपशील घेतला जाणार आहे. गरज भासल्यास त्याच्या सर्व कुटुंबाला अँटिरेबीज लस देण्यात येईल. शवविच्छेदन झाल्यास त्याच्या मृत्यूचे स्पष्ट कारण समजणे शक्य होते.'' -डॉ. प्रसन्न कुलकर्णी, तालुका आरोग्याधिकारी

टॅग्स :DhuledeathStray Dogs