आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करा - अग्रवाल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

जळगाव - नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या मतदारसंघासाठी तीन फेब्रुवारीला मतदान होणार असून, सहा फेब्रुवारीला मतमोजणी होईल. मतदारसंघात येणाऱ्या विभागातील पाचही जिल्ह्यांत तत्काळ प्रभावासह आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. सर्वांनी या आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. तसेच आपापल्या कार्यक्षेत्रात निवडणूक आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रुबल अग्रवाल यांनी आज येथे दिले.

केंद्रीय निवडणूक आयोगाने चार जानेवारीला नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या प्रमुखांची आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसंदर्भात बैठक पार पडली. 

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, उपविभागीय अधिकारी जलज शर्मा, सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जळगाव उपवनसंरक्षक एम. आदर्शकुमार रेड्डी, महापालिका आयुक्त जीवन सोनवणे, निवडणूक उपजिल्हाधिकारी मनोहर चौधरी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार १० जानेवारीस निवडणुकीसाठी अधिसूचना जारी होईल. १७ जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करता येतील. १८ जानेवारीला अर्जांची छाननी होईल. २० जानेवारी अर्ज माघारीची अखेरची मुदत असेल.

पोलिस अधिक्षक डॉ. सुपेकर म्हणाले, की निवडणूककाळात आचारसंहिता भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांत गुन्हा दाखल करा, त्यासाठी पोलिस प्रशासन नेहमीच समन्वय राखून काम करेल. उपजिल्हाधिकारी चौधरी यांनी प्रास्ताविक केले.

४१ मतदान केंद्रे; मतमोजणी नाशिकला
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी जळगाव जिल्ह्यात ४१ मतदान केंद्रे असतील. जिल्ह्यात ४२ हजार ४४२ मतदार या निवडणुकीसाठी आहेत. त्यात आठ हजार ७१७ महिला, २५ हजार ७२५ पुरुष आहेत. अर्ज भरणे, स्वीकृती, छाननी, माघारी ही प्रक्रिया नाशिक विभागीय आयुक्‍त कार्यालयात होईल. जळगाव जिल्ह्याचे मतदान जिल्ह्यात होऊन मतमोजणी नाशिकला होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत आज दिली. आचारसंहिताकाळात नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांनाही आचारसंहिता लागू आहे. निवडणुकीसाठी मीडिया सेल ॲक्‍टिव्ह केले जाईल.

Web Title: Strict implementation of the Code of Conduct