आदिवाशी वसतीगृहाच्या अधीक्षकांच्या हिटलरशाही विरोधात विध्यार्थीनी रस्त्यावर

yeola
yeola

येवला - येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील वसतिगृह अधीक्षकांकडून विविध प्रकारच्या होणाऱ्या त्रासामुळे व हिटलरशाहीने त्रस्त विद्यार्थिनींनी आक्रमक पवित्रा घेतला. वरिष्ठांकडे गा-हाणे मांडण्यासाठी या मुली बुधवारी थेट पायी नाशिकच्या दिशेने मोर्चा घेऊन निघाला होत्या.वरिष्ठांनी या मुलींची समजूत घातल्याने हे आंदोलन शमले मात्र यातील दोन मुलींची तब्येत खालावली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मोबाईल चार्जिंगसाठी पाच रुपये आकारणे,मोबाईलसाठी पैसे कुठून आणले असे विचारणे,शाळेच्या शिक्षकांमार्फत दमबाजी करणे, पोलिसात खोट्या तक्रारी देण्याची धमकी देणे असे प्रकार या वसतिगृहातील अधीक्षकांमार्फत सुरू आहेत. विशेष म्हणजे मुलींकडून पैसे जमा करून त्यातून झाडू,फिनेल इत्यादी साहित्य खरेदीसह या अधीक्षक स्वतःचा मोबाईल देखील रिचार्ज करत असल्याच्या तक्रारी या विद्यार्थिनींनी केल्या आहेत.शासनाकडून आदिवासी विद्यार्थिनींसाठी सवलती व अनुदान दिले जात असताना या अधीक्षकांनी कोणत्या निकषाने पैसे जमा केलेत, आमच्याविषयी नियमबाह्य माहिती विचारण्याचा अधिकार कोणी दिला असे प्रश्न या विद्यार्थिनींनी केले आहेत.

विद्यार्थिनी याबाबत बोलण्यास गेल्या असता त्यांना पोलिसांत तक्रार देण्याची धमकीही दिली जात असायची, टोचून बोलणे,टोमणे मारणे तसेच शाळेच्या शिक्षकांना बोलवून हकनाक काहीही आरोप करून दाखल्यावर लाल शेरा मारण्याची धमकी देणे असे प्रकार अनेक दिवसांपासून सुरु आहेत.

याचमुळे मानसिक त्रस्त ५० वर मुलींनी नाशिक कार्यालयात तक्रारीसाठी पायी मोर्चा नाशिकच्या दिशेने काढला. जळगाव नेऊरपर्यत म्हणजेच ८ ते १० किमीपर्यत चालत गेल्यावर दोन मुलींना चक्कर आल्याने या विषयाला वाचा फुटली. त्यांनतर अधिकारी धावत नाशिकहून येथे पोहोचले. वरिष्ठ निरीक्षक माधव लोणारी, श्री.पगारे, श्री.सरकटे आदींनी या मुलींची भेट घेतल्यावर मुलींनी तक्रारीचा पाढा वाचला. त्यावरून अधिकाऱ्यांनी घटनेस दुजोरा देऊन हे नियमबाह्य कृती असल्याचे सांगत वसतिगृहातील अधिक्षकायांनी मुलींचे गोळा केलेले पैसे मुलींना तात्काळ परत केले जातील असे सांगितले. काहीही बोलणे व सातत्याने पोलिसांत तक्रार देण्याची धमकी या अधीक्षका देत असून सतत होणाऱ्या मानसिक त्रासापासून वाचवा अशी आर्त हाक या मुलींनी यावेळी दिली. दरम्यान आदिवाशी विभागाच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

“वाट्टेल ते बोलणे, पैसे घेणे, आमचे मोबाईल जप्त करून घेणे अन सातत्याने पोलिसांत तक्रार देण्याची धमकी या अधीक्षका देतात. मुली जास्त बोलल्या तर पोलिसांची धमकी द्यायची हे कुठल्या नियमात बसते. काहींना एक वर्ष झाले या हॉस्टेलला येऊन मला दुसरे वर्ष चालू आहे. मात्र नेहमी मुलींना खूप अडचणी दिल्या जातात. आम्ही आदिवासी आहोत हि आमची चूक आहे का.”
-नीतिक्षा तडवी, कीर्ती चंद्रसेन, विध्यार्थिनी 

“मुलींनी ज्या योग्य मागण्या केलेल्या आहेत त्याची पूर्तता झाली शिवाय आम्ही येवला सोडणार नाही.मुलींची तक्रार  पाहता नियमबाह्य कृती झालेली असून आजच्या आज जे काही पैसे घेतलेले असतील ते परत करू.” 
-माधव लोणारी, वरिष्ठ निरीक्षक, आदिवासी विकास, नाशिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com