प्रेमविरहातून ‘फेसबुक’वर पोस्ट टाकत आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

धुळे - सोशल मीडियावरील फेसबुकवर सुसाइड नोट टाकत येथील देवपूरमधील महाविद्यालयीन तरुणाने आत्महत्या केली. दहिवेल (ता. साक्री) येथील मूळचा रहिवासी असून, प्रेम विरहातून आत्महत्या करीत असून मी हे क्रूर कृत्य स्वेच्छेने करीत असल्याचेही त्याने ‘नोट’मध्ये म्हटले आहे. तरुणाच्या मृत्यूने हळहळ व्यक्‍त होत आहे.

धुळे - सोशल मीडियावरील फेसबुकवर सुसाइड नोट टाकत येथील देवपूरमधील महाविद्यालयीन तरुणाने आत्महत्या केली. दहिवेल (ता. साक्री) येथील मूळचा रहिवासी असून, प्रेम विरहातून आत्महत्या करीत असून मी हे क्रूर कृत्य स्वेच्छेने करीत असल्याचेही त्याने ‘नोट’मध्ये म्हटले आहे. तरुणाच्या मृत्यूने हळहळ व्यक्‍त होत आहे.

संकेत सुरेश गवळी (वय १९, रा. दहिवेल) असे त्याचे नाव आहे. दहिवेल येथील उत्तमराव पाटील महाविद्यालयातून तो बारावी विज्ञान शाखेतून नुकताच उत्तीर्ण झाला. त्याचे पुढील शिक्षण धुळ्यात करण्याचे त्याचे नियोजन असल्याने महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या बहाण्याने तो शहरातच थांबला होता. काल रात्री साडेअकराला त्याने फेसबुकवर आत्महत्येपूर्वी पोस्ट टाकली. यानंतर नकाणे रोडवरील उन्नती शाळेजवळील उद्यानाच्या प्रवेशद्वाराला त्याने दोराने गळफास घेतला. आज पहाटे परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार निदर्शनास आला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पश्‍चिम देवपूर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. चौकशीअंती संकेतची ओळख पटली. दहिवेल येथेही त्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. कुटुंबीयांनी लगेच धुळ्यात धाव घेतली. 

भीतीने मुलीही घाबरल्या
आज सकाळी पावणेसहाच्या सुमारास परिसरातील दहावी- बारावीतील काही तरुणी खासगी क्‍लासला जात होत्या. त्यांनीही गळफास घेतलेल्या अवस्थेत त्या तरुणाला पाहिले, एकापाठोपाठ उत्सुकतेपोटी अनेक तरुणींनी हा प्रकार पाहिला. क्‍लासला गेल्यानंतर घाबरल्या अवस्थेत काही तरुणींना रडू कोसळले.

दहिवेल येथे अंत्यसंस्कार
संकेतचा मृतदेह भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करून डॉक्‍टरांनी उत्तरीय तपासणी केली. आज सकाळी अकराला विच्छेदन करून मृतदेह कुटुंबीय, नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. यावेळी रुग्णालयाच्या आवारात मोठी गर्दी झाली होती. दहिवेल येथे दुपारी शोकाकुल वातावरणात संकेतवर अंत्यसंस्कार झाले. तो कुटुंबाचा एकुलता होता.

सोशल मीडियावर संदेश
मृत्यूपूर्वी संकेतने फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, की ‘माझ्या आत्महत्येशी कुणाचाही संबंध नसून हे क्रूर कृत्य मी स्वेच्छेने करत आहे.... माझ्या जाण्याने माझ्या परिवाराला काही त्रास होऊ देऊ नका.. मी जातो’. 

हुशार विद्यार्थ्याची अशी अखेर
संकेतचे शालेय शिक्षण त्याच्या मूळ गावी झाले असून, तो हुशार विद्यार्थी होता.

Web Title: student suicide facebook love