पाचशेच्या आणखी 5 दशलक्ष नोटा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

नाशिक - चलनबदलाच्या धोरणात स्वत:च्या मुद्रणालयावर भिस्त ठेवून पूर्णपणे स्वनियंत्रणात धोरण राबविणाऱ्या रिझर्व्ह बॅंकेने दोन दिवसांपासून केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या मुद्रणालयातील पाचशे रुपयांच्या नोटांच्या पुरवठ्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंक आणि वित्त मंत्रालय अशा दोन्हीच्या मुद्रणालयातून नोटाचा पुरवठा सुरू होण्याने, पुढील आठवडाअखेरपर्यंत नोटांसाठीचा "उद्रेक' कमी होण्याचे संकेत आहेत. 

देशातील जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटाबदलाचा 8 नोव्हेंबरला ऐतिहासिक निर्णय रिझर्व्ह बॅंकेने घेतला. हा निर्णय राबविण्यासाठी आवश्‍यक असलेली गोपनीयता पाळताना रिझर्व्ह बॅंकेने म्हैसूर व सालबोनी येथील मुद्रणालयाचा वापर करीत, 2 हजारांच्या नोटाही तेथेच छापल्या, तर पाचशे रुपयांच्या नवीन नोटांची जबाबदारी मात्र केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या चलन व नाणे निधी विभागाच्या प्रेस महामंडळावर (एसपीएमसीआयएल) सोपविली. त्यानुसार पहिल्या आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेने स्वतःच्या मुद्रणालयात छापलेल्या 2 हजारांच्या नोटा चलनात आणल्या आहेत; पण त्यांची संख्या कमी आहे. सोबतच, 2 हजार रुपये सुट्टे मिळविण्यात अडचणी असल्याने, पाचशेच्या नोटा आणण्याची तयारी चालविली आहे. 

नाशिक रोड येथील चलार्थपत्र मुद्रणालय आणि देवास येथील बॅंक नोट प्रेस या दोन मुद्रणालयातून पाचशे रुपयांच्या नोटा छापून त्या चलनात आणल्या जाणार आहे. यापूर्वी दोन्ही मुद्रणालयातून साधारण दोन आठवड्यापूर्वीच 15 दशलक्ष नोटा रवाना झाल्या आहेत. पण कालपासून पुन्हा पाचशेच्या नव्या नोटाचा पुरवठा सुरू झाला आहे. काल आणखी 5 दशलक्ष नोटा रवाना झाल्या. याशिवाय पुढील आठवड्यात 100, 50 आणि 20 रुपयांच्याही नोटाचा चलनात पुरवठा वाढण्याचे संकेत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेच्या मुद्रणालयातील 2 हजारांच्या आणि वित्त मंत्रालयाच्या मुद्रणालयातील पाचशेपासून, तर 20 रुपयांपर्यतच्या नोटांचा चलनातील पुरवठा वाढण्याचे संकेत आहेत. 
 
कोट्यवधी नोटा तयार 
महामंडळाच्या अंदाजानुसार, कोट्यवधीच्या नोटा तयार आहेत. पाचशे रुपयांपासून तर अगदी 20 रुपयांपर्यतच्या नोटा उपलब्ध असल्याने पुढील आठवडाभरात जनतेतील असंतोष कमी होऊ शकेल. पाठविलेल्या नोटांशिवाय मुद्रणालयांकडे छापून तयार असलेल्या नोटांचा साठा आहे. 

Web Title: supply of five hundred rupees notes