धावत्या रेल्वेत लूटमार करणारी ‘सुरती गॅंग’ जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

मोबाईलसह पैशांसाठी प्रवाशांना मारहाण; शहरात दरोड्याचा प्रयत्न

जळगाव - रेल्वेतील गुन्हेगारीत कुख्यात ‘गेंदालाल मिल गॅंग’ची गुजरातमधील ‘शॅडो गॅंग’ असलेल्या ‘सुरती टोळी’ने सुरत- जळगावदरम्यान लूटमार करून प्रवाशांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या होत्या. हीच टोळी शहरातील स्थानिक चोरट्यांच्या मदतीने दरोड्याच्या तयारीत असताना शहर पोलिसांनी चौघांना जेरबंद केले.

मोबाईलसह पैशांसाठी प्रवाशांना मारहाण; शहरात दरोड्याचा प्रयत्न

जळगाव - रेल्वेतील गुन्हेगारीत कुख्यात ‘गेंदालाल मिल गॅंग’ची गुजरातमधील ‘शॅडो गॅंग’ असलेल्या ‘सुरती टोळी’ने सुरत- जळगावदरम्यान लूटमार करून प्रवाशांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या होत्या. हीच टोळी शहरातील स्थानिक चोरट्यांच्या मदतीने दरोड्याच्या तयारीत असताना शहर पोलिसांनी चौघांना जेरबंद केले.

मध्य व पश्‍चिम रेल्वेचे महत्त्वपूर्ण ‘जंक्‍शन’ म्हणून जळगाव रेल्वेस्थानकाची ओळख आहे. दिवसाला सुमारे पन्नास हजारांवर प्रवासी दोन्ही मार्गांवरून ये-जा करतात. ‘सीझन’मध्ये हा आकडा दीड लाखावर पोहोचतो. याच पार्श्‍वभूमीवर या मार्गांवर रेल्वेतील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

अमळनेरच्या कुटुंबाला त्रास
अमळनेर येथील रहिवासी लक्ष्मण पौलाद कोळी (वय ४०, रा. हिंगोणेसिम, ता. अमळनेर) कुटुंबीयांसह भुसावळ येथे लग्न समारंभास जायचे असल्याने, आज सकाळी साडेसातला पॅसेंजरमध्ये बसले. याच गाडीत सुरतहून बसलेल्या गुन्हेगारी टोळक्‍याने धरणगावजवळ लक्ष्मण कोळी यांच्याशी वाद घालून मारहाण केली. मोबाईल आणि पैसे हिसकावण्यासाठी त्यांनी कोळींना मारहाण करीत ऐवज लांबविला. रेल्वे जळगावात आल्यानंतर स्थानक गाठण्यापूर्वीच दोन्ही गटांनी एकामागून एक उड्या घेत पळ काढला.

अटकेतील संशयित ‘सुरती गॅंग’चे
पोलिसांनी अटक केलेले चारही चोरटे सुरत येथील असल्याचे समोर आले. शेख कादीर शेख इब्राहिम (वय २०), वसीम शेख अजीम शेख (२१), अफजल शाह इस्माईल शाह (२१), शेख शब्बीर शेख मोहंमद (१८) यांचा त्यात समावेश असून, त्यांच्यावर सुरत तसेच रेल्वे पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.

जळगावात मागितली मदत
धावत्या रेल्वेत कोणीही वाली नाही, म्हणून लक्ष्मण कोळी यांनी जळगावात त्यांच्या नातेवाइकांना दूरध्वनी करून मदत मागितली. त्यांचे नातलग भगवान काशिनाथ सोनवणे, सुनील दुर्योधन सैंदाणे, मुन्ना उर्फ रतिलाल संतोष सोनवणे, शुभम रघुनाथ तायडे यांनी तातडीने रेल्वेस्थानकात धाव घेतली. मात्र, नेहमीप्रमाणे भामट्यांची टोळी दूध फेडरेशनसमोरील सुरत मार्गावरील गेटजवळ रेल्वे हळू होताच उड्या घेत पसार झाले होते. संशय म्हणून त्यांचा शोध सुरूच होता.

धावत्या रेल्वेत जबरी लूट, मारहाण
बुधवारी (ता. १५) रात्री सुरत येथून निघालेल्या सुरत- भुसावळ पॅसेंजरमध्ये सात ते आठ गुन्हेगारांची टोळी रात्रभर धिंगाणा घालत होती. त्यात स्थानिक व मूळ सुरत येथील रहिवासी, अशा दोन गटांतील गुन्हेगारांच्या टोळक्‍याने अनेक प्रवाशांकडून बळजबरी पैसे उकळले. काहींकडून मोबाईल हिसकावण्यास सुरवात केली. विरोध करणाऱ्यांना रेल्वेतून फेकून देण्याची धमकी देत दहशत निर्माण केली होती.
 

शहरात दरोड्याचा प्रयत्न

गुजरातची ‘सुरती गॅंग’ व जळगावची स्थानिक ‘गेंदालाल मिलची टोळी’ यांच्यातर्फे शहरात घरफोड्या दरोड्यांचा प्लॅन होता. म्हणून ‘सुरती टोळी’ सकाळीच जळगावात दाखल झाली. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक निरीक्षक आशिष रोही, वासुदेव सोनवणे, विकास महाजन, प्रीतम पाटील, सुनील पाटील, दुष्यंत खैरनार, अमोल विसपुते, नवजीत चौधरी, दीपक सोनवणे यांच्या पथकाला पाठविले. पोलिसांनी दोन वेगवेगळी पथके तयार केली. रेल्वेस्थानक परिसरात ‘निसर्ग हॉटेल’च्या मागील बाजूला पोलिसांच्या पथकाने धडक दिली. पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी झडप घालून चौघांना ताब्यात घेतले.

Web Title: surati gang arrested