सुरेशदादांच्या पक्षांतराचा अंतिम तळ भाजप?

कैलास शिंदे
मंगळवार, 9 मे 2017

याआधीही प्रवेशाचा प्रयत्न 
जैन भाजपमध्ये जाण्यास यापूर्वीच तयार होते. त्यावेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हिरवा कंदीलही दर्शविला होता. परंतु, खडसे यांनी विरोध केल्यामुळे जैन यांचा प्रवेश झाला नसल्याचे सांगण्यात आले. परंतु, आता खडसे यांचे पक्षात वर्चस्व नाही. शिवाय गिरीश महाजन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची "केमिस्ट्री' चांगली जमली आहे. खडसे यांच्या नाराजीमुळे जिल्ह्यात पक्ष वाढविण्यासाठी आपण तत्पर असल्याचे महाजन यांनी दाखवून दिले आहे. पालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला यश मिळाले आहे. 

जळगाव : राज्याच्या राजकीय क्षेत्रात बेधडक आणि निडर व्यक्तिमत्त्व असा लौकिक असलेले शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी यापुढे कोणतीही निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात त्यांच्या पुढील वाटचालीबाबत राजकीय क्षेत्रात तर्कतिर्कांना उधाण आले आहे. तथापि, राजकीय संन्यास घेण्याऐवजी ते नेतृत्वाच्या भूमिकेत राहण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. पक्ष बदलण्यात कधीही कमीपणा बाळगला नाही, त्यामुळेच आपला राजकीय जीवनाचा शेवट ते भाजपत स्थान मिळवून करतील काय, याबाबत त्यांच्या समर्थकांसह विरोधकांमध्येही चर्चा सुरू झाली आहे. 

घरकुल प्रकरणात कारागृहातून जामिनावर सुटल्यानंतर जैन यांनी गेल्या सहा महिन्यांपासून जाहीर कार्यक्रमांना जाणे टाळले होते. जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी शिवसेना उमेदवारांना निवडून द्या, या आवाहनापलीकडे कोणतेही राजकीय विधान केले नव्हते. मात्र, त्यांनी नुकतेच एका जाहीर कार्यक्रमात "यापुढे निवडणूक लढविणार नाही' असे जाहीर केले. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यावरून ते राजकीय संन्यास घेणार असल्याचे संकेत असल्याचे सांगण्यात येत असले, तरी जैन यांची जळगाव शहरावरील राजकीय पकड पाहता ते संन्यास न घेता नेतृत्वाच्या भूमिकेत कायम राहणार असल्याची शक्‍यता आहे. 

आता पुढील राजकीय वाटचालीत ते शिवसेनेतच राहतील काय, याबाबत मात्र साशंकता आहे. केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपमध्ये जाण्याची त्यांची शक्‍यता अधिक व्यक्त होत आहे. ते मोदी यांचे समर्थक असून, गुजरातमधील भूकंपानंतर त्यांनी पुनर्वसनासाठी मदत केली होती. मोदी यांच्या गुजरात पॅटर्न विकासाचे जैन यांनी वेळोवेळी जाहीरपणे कौतुकही केले आहे. 

महाजन-जैन यांच्यातील सख्य 
जिल्ह्यात भाजप नेते एकनाथराव खडसे व जलसंपदामंत्री महाजन यांच्यात वाद सर्वश्रुत आहे. मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर खडसे यांची पक्षावर नाराजी कायम आहे. त्याचवेळी दुसरीकडे भाजपचे नेते व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सुरेशदादा जैन यांच्याशी सख्य जोपासले. कारागृहात असताना जैन यांची भेट घेतली होती. जैन कारागृहातून सुटून आल्यानंतरही महाजन यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या शिवाय भाजपच्या विधान परिषद उमेदवाराच्या विजयासाठी जैन यांच्या नेतृत्वाखालील खानदेश विकास आघाडीने साथ दिली होती. त्यानंतर भाजप उमेदवाराच्या विजयाचा जल्लोष मंत्री महाजन यांनी जैन यांच्या निवासस्थानी त्यांच्या उपस्थितीत केला होता. त्यावेळी भाजपचे आमदार सुरेश भोळे उपस्थित होते. त्यानंतर वेळोवेळी महाजन व जैन यांच्या भेटी होत आहेत. जामनेर येथे महाजन यांच्या निवासस्थानीही जैन गेले होते. त्यामुळे जैन आता भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

भाजपचे समीकरण 
जळगाव महापालिकेत जैन यांच्या नेतृत्वात सत्ता आहे. शिवाय जैन यांचा जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात दबदबा आहे. जैन भाजपत आल्यास महापालिकेवर भाजपची सत्ता येईल आणि शत-प्रतिशत भाजपचे समीकरण पूर्ण होईल, असे महाजन पक्षाला पटवून देवू शकतात. सद्यःस्थितीत महाजन आणि जैन यांचे सख्य पाहता महाजन यांनी प्रयत्न केल्यास जैन यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग खुला होऊ शकतो. जैन आणि त्यांचे समर्थकही त्याला नकार देण्याची शक्‍यता कमीच आहे. जैन यांची आता खासदार होण्याची इच्छा आहे. भाजप त्यांची राज्यसभेवर नियुक्ती करू शकते. कारण त्यासाठी जनतेत जाऊन मते मागावीच लागत नाही. त्यामुळे जैन यांचा पुढचा प्रवास भाजपतच होणार असल्याचे समजले जात आहे. 

Web Title: suresh jain on the way to bjp