स्वामिनाथन आयोगासाठी 'जेल भरो' आंदोलन करू : रघुनाथदादा पाटील

स्वामिनाथन आयोगासाठी 'जेल भरो' आंदोलन करू : रघुनाथदादा पाटील

श्रीरामपूर : "सध्याचे भांडवलदारधार्जिणे सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबविण्यात दंग आहे. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा करून सत्तेत आल्यानंतर त्यांनी विश्‍वासघात केला. स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्याच्या मागणीसाठी सुकाणू समिती राज्यभर 'जेल भरो' आंदोलन करणार आहे,'' अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिली.

शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीतर्फे हुतात्मा जवानांना अभिवादन व शेतकरी जागर यात्रा काढण्यात आली. गोवर्धनपूर येथील हुतात्मा रामचंद्र धंदेवार यांच्या स्मारकाला अभिवादन करून ही यात्रा येथे आली. बाजार समितीच्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील शेतकरी सभागृहात झालेल्या शेतकरी मेळाव्यात पाटील बोलत होते. यावेळी सत्यशोधक शेतकरी सभेचे किशोर ढमाले, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, जिल्हा सुकाणू समितीचे समन्वयक कॉम्रेड बन्सी सातपुते, राज्य सुकाणू समितीचे सदस्य नामदेव गावडे, मोदिना शेख, राजेंद्र बावके, बाळासाहेब सुरुडे, बाबा अरगडे, दत्तात्रेय कांदे, संजय जगताप, "प्रहार'चे अजय महाराज बारस्कर आदी उपस्थित होते. 

पाटील म्हणाले, "भविष्यात उसाचे क्षेत्र वाढणार आहे. उसाला किमान किफायतशीर मूल्यानुसार (एफआरपी) भाव दिला पाहिजे; पण कारखाने वेळेवर पैसे देत नाहीत. कायद्यानुसार कारखान्यांनी 14 दिवसांत पैसे न दिल्यास ते राज्य सरकारने द्यायला हवेत, यासाठी संघर्ष करावा लागेल. सरकारने दुधाला 27 रुपये लिटर दर ठरवून दिला असताना एवढा भाव कधीच शेतकऱ्यांना मिळाला नाही. 

दूध संघ भांडवलदारांचे आहेत. ते नियमाप्रमाणे भाव देत नाहीत, तरीही त्यांच्यावर सरकार कारवाई करीत नाही. यामागे काय गौडबंगाल आहे? शेतमालावरील निर्यातबंदी उठविली जात नाही. उद्योगपतींच्या फायद्यासाठी शेतमालाला कमी भाव दिला जातो.'' 
किशोर ढमाले म्हणाले, "सरकार खुनशीपणाने वागत आहे. भांडवलदारांना कर्जमाफी दिली; मात्र शेतकऱ्यांना नाही. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरही सरकार त्यांच्या कुटुंबीयांसोबत वैरभावाने वागते. सरकारचे आयात-निर्यात धोरण शेतकरीविरोधी आहे.'' बाळासाहेब पटारे यांनी सूत्रसंचालन केले. आप्पासाहेब वाबळे यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com