जामदा नदीपात्रातून वाळूची चोरी; तहसिलदार कैलास देवरे यांची कारवाई

दीपक कच्छवा
गुरुवार, 24 मे 2018

झटपट श्रीमंत होण्याचे वेध 
वाळू चोरीच्या व्यवसायात सध्या तरुण पिढी उतरली आहे. यात कमी वेळेत जास्त पैसा मिळतो. मात्र, यामुळे तरुण व्यसनाधीन होत चालले आहेत. जिवावर उदार होऊन रात्रीची वाळू चोरी केली जाते. यात काही चांगल्या घरातील मुले देखील सहभागी झाली आहेत. ज्या तरूणांना शिक्षण असून नोकरी मिळत नाही असेही पदवीधर यात गुंतले आहेत. त्यामुळे तरूणांना वाळू व्यवसायातून झटपट श्रीमंत होण्याचे वेध लागले आहे. 

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : जामदा (ता. चाळीसगाव) नदीपात्रातून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्‍टर्सवर स्वतः तहसीलदार कैलास देवरे यांनी कारवाई केली. वाळू चोरी करणारे ट्रॅक्‍टर्स मेहुणबारे पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. या आठवड्यात झालेली ही सलग दुसरी कारवाई आहे. कारवाया होऊनही वाळू चोरी थांबत नसल्याचे दिसून येत आहे. 

जामदा गिरणा नदीपात्रात काही दिवसांपासून रात्रीची चोरटी वाळू वाहतूक सुरू आहे. तहसीलदार कैलास देवरे यांनी आज पहाटे पाचच्या सुमारास अचानक नदीपात्रात धडक दिली असता, वाळूचे दोन ट्रॅक्‍टर्स मिळून आले. या कारवाईमुळे नदीपात्रातील ट्रॅक्‍टर चालकांची एकच भंबेरी उडाल्याचे दिसून आले. 

आठवड्यात दुसरी कारवाई 
नदीपात्रात मिळून आलेल्या ट्रॅक्‍टरवरील चालक गोरख काकडे व गणेश वाघ यांनी दिलेल्या माहितीवरून हे ट्रॅक्‍टर्स भोलेनाथ काकडे व रवींद्र काकडे यांच्या मालकीचे असल्याचे तहसीलदार श्री. देवरे यांनी सांगितले. पाच दिवसांपूर्वी सेवानिवृत्त पोलिस हवालदार प्रकाश मगर यांच्या वाळूच्या ट्रॅक्‍टरवर कारवाई झाली होती. ही घटना ताजी असतानाच आज दुसरी कारवाई तहसीलदार श्री. देवरे यांनी केली. 

रात्री होतेय वाळू चोरी 
जामदा, वडगाव लांबे व मेहुणबारे या भागात रात्रीच्या सुमारास सर्रास वाळू उपसा सुरू आहे. मेहुणबारे गिरणा नदीपात्रातही वाळूची चोरी होत आहे. या व्यवसायात काही राजकीय पदाधिकारी उतरल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांना बऱ्याचदा कारवाई करताना अडचणी येत असल्याचे एका शासकीय कर्मचाऱ्याने सांगितले. जामदा व वडगाव लांबे येथील गिरणा पात्रातून रात्रीच्या सुमारास वाळू उपसा करून वाहतूक होत आहे. 

झटपट श्रीमंत होण्याचे वेध 
वाळू चोरीच्या व्यवसायात सध्या तरुण पिढी उतरली आहे. यात कमी वेळेत जास्त पैसा मिळतो. मात्र, यामुळे तरुण व्यसनाधीन होत चालले आहेत. जिवावर उदार होऊन रात्रीची वाळू चोरी केली जाते. यात काही चांगल्या घरातील मुले देखील सहभागी झाली आहेत. ज्या तरूणांना शिक्षण असून नोकरी मिळत नाही असेही पदवीधर यात गुंतले आहेत. त्यामुळे तरूणांना वाळू व्यवसायातून झटपट श्रीमंत होण्याचे वेध लागले आहे. 

वाळू चोरी करणाऱ्या ट्रॅक्‍टरवर आता नवीन नियमानुसार 1 लाख रुपये व वाळूचे 25 हजार रुपये असा सव्वालाख रुपये दंड लागणार आहे. कुठेही वाळू चोरी होत असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा. याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे. 
- कैलास देवरे, तहसीलदार, चाळीसगाव

Web Title: tahsildar action against sand mafia in Jamda