Construction Case : प्रशासनासमोर व्यापाऱ्यांनी वाचला समस्यांच्या पाढा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Construction Case : प्रशासनासमोर व्यापाऱ्यांनी वाचला समस्यांच्या पाढा!

Construction Case : प्रशासनासमोर व्यापाऱ्यांनी वाचला समस्यांच्या पाढा!

तळोदा (जि. नंदुरबार) : शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने होत असून, संतप्त व्यापाऱ्यांनी पालिका (Corporation) व महसूल प्रशासनाला भेटून कामासंदर्भात तक्रारींचा पाढाच वाचला. (Taloda Main Road construction issue promised to hold joint meeting with contractor immediately nandurbar news)

पालिकेचा सक्षम अधिकारी कामावर उपस्थित नसणे व नागरिकांना स्वखर्चाने नळजोडणी करावी लागणे यांसारख्या समस्या व्यापाऱ्यांनी मांडल्या. व्यापाऱ्यांच्या समस्या ऐकून मुख्याधिकारी सपना वसावा व तहसीलदार गिरीश वखारे यांनी तातडीने ठेकेदारासोबत संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

शहरातील मुख्य बाजारपेठेतील मेन रोडच्या कामाला मागील दोन महिन्यांपासून सुरवात झाली. या कामासाठी शासनाने एक कोटी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र या मेन रोडचे काम अत्यंत संथगतीने होत असल्याचे व्यापारांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या व्यवसायावरदेखील परिणाम झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे ठेकेदार निविदेप्रमाणे काम करीत नाही. गटारीसाठी पाइप टाकण्यात आले; परंतु त्यांना नैसर्गिक उतार दिलेला नाही. गटारीचे पाइप टाकताना पालिकेचा कोणताही सक्षम अधिकारी उपस्थित नसतो.

ठेकेदाराने दगड-रेती टाकल्यावर एकदाही रोलर फिरविलेला नाही. एवढेच नव्हे तर पिण्याच्या पाण्यासाठी नळजोडणीसाठी व्यापाऱ्यांनी स्वखर्चाने नळजोडणी केली व त्याकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांचा आहे.

पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारीचे चेंबर सदोष व पुरेसे न बनविणे अशा तक्रारींचा पाढा व्यापाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांपुढे वाचला.

त्यामुळे त्यांनी ठेकेदाराला सूचना देऊन यावर तोडगा काढणार असल्याचे सांगितले. दुसरीकडे व्यापाऱ्यांनी तहसीलदार गिरीश वखारे यांनादेखील पालिका प्रशासनाला कामाची गती वाढविण्यासाठी सूचना करण्याची विनंती केली.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

या वेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष आनंद सोनार, माजी उपनगराध्यक्ष गौतम जैन, मुकेश जैन, सुभाष जैन, प्रसाद सोनार, अमित ठक्कर, हुकूमचंद जैन, गणेश सोनार, बटुक जैन, निखिल सोनार, अश्विन सोनार, राहुल जैन, संजय सोनार, कृष्णा सोनार, नंदू जोहरी, मुकेश वाणी, ईश्वर मगरे, दिलीप जैन, राणुलाल जैन, दिनेश हिवरे, प्रफुल्ल माळी, मुस्तफा बोहरी आदी व्यापारी उपस्थित होते.

रस्त्याचे काम रामभरोसे

बांधकाम सुरू असलेल्या मेन रोडवर काम सुरू असताना पालिकेचा कोणताही सक्षम अधिकारी अथवा अभियंता स्वतः हजर राहून नियमित देखरेख करत नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.

त्यामुळे एवढ्या महत्त्वाच्या रस्त्याचे कामही रामभरोसेच होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालिकेच्या सक्षम अभियंत्यास नियमितपणे देखरेख ठेवण्याची सक्त ताकीद देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.