करवाढीच्या विरोधात एकवटल्या ऑटोरिक्षा चालक संघटना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

जळगाव - केंद्र सरकारने नव्या अध्यादेशाद्वारे स्कूलबस, टॅक्‍सी, व्हॅन, रिक्षांवर भरमसाठ करवाढ केली आहे. या अन्यायकारक करवाढीच्या विरोधात सर्वच ऑटोरिक्षा संघटना एकवटल्या आहेत. काही संघटनांच्या बैठका होऊन त्यात या करवाढीचा निषेध केला, तर काहींनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदनही दिले. करवाढ मागे घेतली नाही, तर बेमुदत बंद पुकारण्यात येईल, असा इशाराही या संघटनांनी दिला आहे.

केंद्र सरकारने विविध वाहनांच्या नोंदणी, नूतनीकरण तसेच परवाना शुल्कात मोठी वाढ केली असून, ती तत्काळ प्रभावपद्धतीने लागूही केली आहे. मात्र, ही मोठी करवाढ अन्यायकारक असून त्याविरोधात सर्वच रिक्षाचालक संघटनांचे चालक-मालक एकवटले आहेत.

सावरकर रिक्षा युनियन
जळगाव शहरातील वीर सावरकर रिक्षा युनियनची याबाबत नुकतीच बैठक झाली. बैठकीत करवाढीचा निषेध केला. बैठकीला रिक्षा, टॅक्‍सीचालक, मालक तसेच मालवाहतूकदार संघटनांचे प्रतिनिधी, स्कूलबस चालक, व्हॅनचालक आदी उपस्थित होते. ही करवाढ अन्यायकारक असून, ती मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा या बैठकीतून देण्यात आला.

स्वतंत्र ऑटोरिक्षा युनियन
जळगाव रेल्वेस्थानक परिसरातील स्वतंत्र ऑटोरिक्षा युनियनने या करवाढीचा विरोध केला आहे. नोंदणीशुल्क, नूतनीकरण, परवाना आदी करात केलेली वाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी या युनियनतर्फे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. यासंदर्भात शनिवारी 28 जानेवारीला युनियनची बैठक होणार असून त्यात आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. 1 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद पुकारण्याचा इशारा संघटनेतर्फे अध्यक्ष सय्यद हैदरअली, प्रमोद सुरळकर, राजेंद्र इथापे यांनी दिला आहे.

आंबेडकर रिक्षा युनियन
रेल्वेस्थानक परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा युनियननेही या करवाढीला विरोध केला असून या संघटनेची बैठक शनिवारी 28 तारखेला रेल्वेस्थानकाजवळील हॉटेल देव हाईटस्‌ येथे होत आहे. बैठकीत बंद पुकारण्याबाबत दिशा ठरवली जाईल, असेही संघटनेच्या पत्रकात शांताराम अहिरे, जितेंद्र अहिरे, जितू उमाळे यांनी म्हटले आहे.

Web Title: tax increase oppose auto rickshaw driver organisation