येवल्यात अपुरे शिक्षक ओढताय शाळांचा गाडा; ११६ जागा रिक्तच

येवल्यात अपुरे शिक्षक ओढताय शाळांचा गाडा; ११६ जागा रिक्तच

येवला : दोनदा पालकमंत्री, जिल्हा परिषदेचे दोन वेळेस अध्यक्षपद मिळूनही तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना लागलेले अपुऱ्या शिक्षक संख्येचे ग्रहण पंधरा-वीस वर्षानंतरही सुटलेले नाही. आजही तालुक्यात शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकाऱ्यांच्या तब्बल ११६ जागा रिक्तच आहे. यामुळे अध्ययन-अध्यापनाचा खेळखंडोबा होऊन गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होऊ पाहत आहे. शिक्षक भरतीच होत नसल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांना गुरुजी देता का गुरुजी असे दरवर्षी म्हणावे लागत आहे. 

एकीकडे शासन आरटीई कायद्याचा बागुलबुवा दाखवून आठवीपर्यंत शिक्षण सक्तीचे करत आहे तर, दुसरीकडे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक शिक्षक उपलब्ध करून देण्याची काळजी मात्र सोयीस्कररित्या दुर्लक्षित होत आहेत. यामुळे अनेक पालक मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकावे की, नाही अशा विवंचनेत आहेत. 

जिल्हा परिषदेच्या काही शाळांनी गुणवत्तेत बाजी मारून इंग्रजी माध्यमांच्या मुलांना आकृस्ष्ट केले असल्याने शाळाची क्रेज वाढत आहे, मात्र पालकांचा वाढलेला विश्वास वर्षानुवर्षे अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे उडण्याचीही भीती आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ २०१४ मध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर, त्यांनी मायावती पगारे व राधाकिसन सोनवने यांना सलग पाच वर्ष अध्यक्षपदाची संधी दिली होती. त्यांनाही येथील शाळांना पूर्णपणे शिक्षक देतां आलेले नाही,तेव्हा आता काय होईल असा प्रश्नच आहे. 


गंभीर म्हणजे यावर्षी २२ शिक्षक बदलून गेले आणि ३१ शिक्षक आले. तरीही आज येथील शाळांना पदवीधर ३६ व उपशिक्षक ४७ असे शिक्षकांची ८३ पदे रिक्त आहे. अनेक तीन-चार शिक्षकी शाळा एका शिक्षकावर तर कुठे पाच-सहा शिक्षकांची गरज असताना दोन ते तीन जण कार्यरत आहेत. १८ शाळांना मुख्याध्यापकच नसल्याने वरिष्ठ शिक्षकानाच आपले काम सांभाळून हे ओझे उचलावे लागत आहेत. याशिवाय केंद्रप्रमुखांची अठरा पदे मंजूर असतांना तब्बल १२ तर विस्तार अधिकाऱ्यांची ६ पदे मंजूर असतांना ३ पदे रिक्त आहे.यामुळे कामकाज विस्कळीत होऊन
संबंधित शाळांतील ‌विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने प्राथमिक शिक्षणाचे बारा वाजणार असे चित्र आहे.


“जिल्हा परिषदेला मागील वर्षीही निवेदन देऊन शिक्षकांची पदे भरण्याची मागणी केली होती.या वर्षी बदल्यांमध्ये पुरेशा प्रमाणात शिक्षक मिळण्याची अपेक्षा होती. परंतु आजही ११६ पदे रिक्त असल्याने शैक्षणिक गुणवत्ता खालावण्याची भीती आहे. याप्रश्नी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटून पुरेश्या प्रमाणात शिक्षक मिळण्याची मागणी करणार आहे."
- रुपचंद भागवत, उपसभापती, पंचायत समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com