शाब्बास गुरुजी! एका शिक्षिकेची शाळेच्या नाविन्यतेसाठी धडपड

राजेंद्र दिघे : सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

अशिक्षीत पालकांच्या अडीअडचणी समजून घेत शाळेपर्यंत आणणं मोठं जिकिरीचे काम असते.आरोग्य,स्वच्छता, शिक्षण व नियमितता या चतु:सुत्रीने 
निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या टुमदार बेडकीपाडा (ता.कळवण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समृद्ध करणा-या धनश्री जाधव यांच्या नाविन्यतेची धडपड.

मालेगाव  : नवीनच सुरूवात म्हटली की,उमेद व उत्साह खूप असतो.घराची कळा अंगण सांगते तसं गावची शाळा गावचं समृद्धपण दर्शविते. छोट्याशा खेड्यात गुरूजींचा आजही सन्मान आहे. तिथल्या लेकरांशी त्यांच्याच भाषेत समरस होत हळूहळू बदल होतो. समस्या अनेक असतात. यावर टप्याटप्याने उपाय करून जागृती होते.अशिक्षीत पालकांच्या अडीअडचणी समजून घेत शाळेपर्यंत आणणं मोठं जिकिरीचे काम असते.आरोग्य,स्वच्छता, शिक्षण व नियमितता या चतु:सुत्रीने 
निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या टुमदार बेडकीपाडा (ता.कळवण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समृद्ध करणा-या धनश्री जाधव यांच्या नाविन्यतेची धडपड.

आपल्या समोरील मुलांच्या समस्या, त्यावर उपाय व कार्यवाही करत बदल होतो. माता-पालक प्रबोधन, दरमहा बैठक, बदलाचे परिणाम दिसू लागले. परिस्थिती नसताना पालकांची खासगी संस्थेकडे ओढ होती. मुलांमधील बदलाने ही परिस्थिती बदलत आहे. बाहेर गावी जाणारी मुलेही परतायला लागले. शैक्षणिक अनास्था अनुपस्थितीचे प्रमाणावर मात केली. पालक मुलांना शाळेत पाठविण्याऐवजी लहान मुलांना सांभाळणे, गुरे राखणे, मासे पकडणे यासारखी कामे लावत. मुख्याध्यापक नारायण खैरनार व जाधव यांनी परिवर्तनाची बिजे रोवली. शालेय परिसर देखणा केला. वृक्षारोपणाने बहर आणला. फुलबाग फुलवली.

आनंददायी व कृतीची जोड

आनंददायी कृतीयुक्त अध्यापनामुळे नियमितता वाढून पट वाढला. गणितात संख्या ओळख,संख्येवरील क्रियेतील अडथळे दूर केले. शैक्षणिक साहित्याचा वापर करून अंक दृढीकरण केले. चॉकलेट,गोट्या,केळी,बिस्कीट, गोळयांचा वापराने आनंद वाढला. अंकाएवढ्या उड्या मारा,जम्प ऑन, अंकाएवढे खडे आणा असे गणिती खेळ घेऊन भीती कमी केली. गणित पेटीतील साधनांचा रचनात्मक व सुलभ वापर केला. टोपीखाली दडलयं काय?, चुटकी आणि टाळ्या, रंगवलेल्या खड्या, गणिती जाळी या उपक्रमातुन हीच पोरं कोटीपर्यंत संख्या सहजच वाचतात. जाधव यांनी इंग्रजीसाठी मनोरंजनात्मक खेळ घेतले. इन्सट्रक्शनस देत शब्द संवाद वाढला. नीटसं मराठी न बोलणारे इंग्रजीत बोलत आहेत.अध्यक्ष करंडक स्पर्धेत वक्तृत्व, नृत्य, गायनासह धावण्यात बेटकीपाडाचा झेंडा रोवला. तालबद्ध संगीतमय परिपाठ वैशिष्ट्यपूर्ण आहे.अध्यापनात डिजीटल साधनांचा वापर केला.

अध्यापनात तंत्रज्ञान

तंत्रज्ञानाने सध्या संगणकाव्दारे शिकविले जाते. कॉम्प्युटरने कमालीची प्रगती दिसुन आली. सहज हाताळतात, प्रिंट काढतात. बदलांचा सकारात्मक प्रतिसादाने स्वत: धनश्री यांनी युट्युब चॅनल निर्मिती केली. उपक्रमांचे व्हिडिओ गावातील व्हॉट्स ॲप समुहावर शेअर करून पालकांची जागृती झाली. त्यामुळे गैरहजेरी कमी झाली. आपल्या लेकरांचे कौतुक वाटू लागले. गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव यांचे मार्गदर्शन उर्मी देणारे आहे.

प्रतिक्रिया

गुणवत्तापुर्ण दर्जेदार शिक्षणाची गंगोत्री वाहती ठेवू. शाळेचा नावलौकीक वाढवून गाव समृद्ध करण्याचा संकल्प केला आहे.
- धनश्री जाधव, उपक्रमशील शिक्षिका

शिक्षकांच्या मेहनतीला पालकांचा सकारात्मक प्रतिसाद हे या शाळेचे यश आहे.गुणवत्तेसह सर्व पातळीवर उत्कृष्ट कार्य या शिक्षकांचे आहे.
- सुभाष भामरे, केंद्रप्रमुख, कनाशी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: teacher strives for school innovation