Sakal Exclusive : ‘नकोशी’च्या जीवनात परतली पुन्हा ‘खुशी’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Exclusive : ‘नकोशी’च्या जीवनात परतली पुन्हा ‘खुशी’!

Sakal Exclusive : ‘नकोशी’च्या जीवनात परतली पुन्हा ‘खुशी’!

तळोदा (जि. नंदुरबार) : जन्मदात्यांनी नदीकिनारी फेकून (Thrown) दिल्यानंतर खाकी, नागरिकांच्या माणुसकीमुळे आणि जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागाच्या संपूर्ण स्टाफच्या परिश्रमामुळे ‘नकोशी’ आता ‘खुशी’ झाली आहे. (team of doctors succeeded in saving baby who were thrown away nandurbar news)

निष्ठुर जन्मदात्यांनी चिंताजनक अवस्थेत नदीकिनारी सोडून दिल्यानंतर स्त्रीभ्रूण असलेल्या या बाळाने तब्बल दोन महिने जगण्याची लढाई लढली व ती जिंकलीसुद्धा. त्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त करीत, तिचा जीव वाचविण्यासाठी परिश्रम घेणाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

अक्कलकुवा येथील नदीकिनारी एका स्त्रीभ्रूणला फेकण्याची घटना १३ डिसेंबरला घडली होती. परिसरातील नागरिकांना बाळाचा आवाज आल्याने त्यांनी याबाबत स्थानिक पोलिसांना कळविले. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. बाळाची अवस्था पाहून सर्वांना गहिवरून आले.

पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्वरित तिच्यावर उपचार सुरू केले. मात्र बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याने मध्यरात्री (ता. १४) डॉ. कृष्णा पटेल, पोलिस शिपाई सविता जाधव, अमरसिंग पाडवी यांनी बाळाला रुग्णवाहिकेने गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात दाखल केले.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

रुग्णालयात बाळाची परिस्थिती अत्यंत गंभीर होती. मात्र बाळाने तब्बल दोन महिने विविध आजारांशी सामना करीत जगण्याची लढाई जिंकली. नर्सिंग इन्चार्ज निर्मला राऊत, मोनिका बागले यांच्या मार्गदर्शनाखाली बाळाची दूधप्राशन, स्वच्छतेची काळजी संपूर्ण स्टाफने घेतली.

बाळाच्या उपचारासोबत त्याला अंगाईगीत गाऊन झोपविण्यापर्यंतची कवायत मामा-मावशी, नर्सिंग स्टाफला करावी लागली. पोलिस प्रशासनाने दिवसरात्र बाळाच्या सुरक्षतेसाठी खडा पहारा दिला. बाळाचे ‘खुशी’ असे नामकरण करीत, ‘खुशीला’ गुरुवारी (ता. १६) जिल्हा बालकल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आले.

बाळ जगावे यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, अतिरिक्त शल्यचिकित्सक के. डी. सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोगतज्ज्ञ डॉ. किसन पावरा, डॉ. हेमंतकुमार चौरे, डॉ. कृष्णा वळवी आणि एसएनसीयू विभागातील सर्व वैद्यकीय अधिकारी, स्टाफ, सफाई कर्मचाऱ्यांनी खूप परिश्रम घेतले.

चिंताजनक परिस्थितीवर मात

बाळाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्या वेळी त्याच्या अंगाला कीटक, मुंग्या चिकटलेल्या होत्या. अंगावर ठिकठिकाणी कीटकांनी दंश केल्याचा खुणा होत्या. बाळ कमी दिवसांचे (अंदाजे सात-आठ महिन्यांचे),

कमी वजनाचे (१३०० ग्रॅम) होते व त्याची वाढ परिपूर्ण झालेली नव्हती. त्याला श्वासोच्छ्वासाचा त्रास होता. बाळ अक्षरशः थंडगार, निळे पडले होते. मात्र बाळ जगावे यासाठी बालरोगतज्ज्ञ डॉ. किसन पावरा, डॉ. हेमंतकुमार चौरे यांनी दररोज जातीने लक्ष देत बाळावर उपचार केले.

जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्या वेळी बाळाची प्रकृती अत्यंत नाजूक होती. मात्र एसएनसीयू इन्चार्ज तथा बालरोगतज्ज्ञ डॉ. किसन पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित उपचार सुरू केले. गेले दोन महिने सर्व स्टाफने बाळाची काळजी घेतली, बाळ जगल्याने मनस्वी आनंद होत आहे. -डॉ. लक्ष्मीकांत चौधरी, वैद्यकीय अधिकारी एसएनसीयू, जिल्हा रुग्णालय

टॅग्स :Nandurbarnew born baby