ठाणगावकरांना पडला पाणी टंचाईचा प्रश्न

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

“अंदाजपत्रकानुसार योजनेचे काम होणे अपेक्षित असताना काम पूर्ण केले नाही. मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. निधी खर्च करूनही काम गेल्या चार वर्षांपासून अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारावर प्रशासनाने कडक कारवाई करावी”   

-रवींद्र शेळके,माजी सदस्य

येवला : हाकेच्या अंतरावर पाटोद्यात पालखेड कालव्याचे पाणी मिळवणे शक्य असूनही नियोजनासह विविध अडचणींमुळे ठाणगावकरांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत सुमारे पन्नास लाख रुपयांची योजना मंजूर झाली होती. मात्र, एवढा निधी खर्च होऊनही विहीर खोलीकरण,पंप हाउस,गावांतर्गत पाईपलाईन ही महत्वाची कामे अपूर्णच असल्याने ही योजना कुचकामी ठरली आहे.

परिणामी आज येथे आठ-दहा दिवसांतून पाणीपुरवठा होतो पण तोही दहा-पंधरा मिनिटेच. ठाणगावच्या पाणीपुरवठ्यासाठी २०१४ मध्ये ग्रामपंचायत सदस्यांनी पाठपुरावा करून राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत विहीर खोलीकरण, नवीन पाईपलाईन व इतर कामांसाठी सुमारे पन्नास लाखाचा निधी मिळवला.

मात्र, काम घेणाऱ्या ठेकेदाराने योजनेची व निधीची वाट लावली आहे. पाटोदा येथील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीपासून ते ठाणगाव येथील टाकीपर्यंत तसेच निम्या गावात पाईपलाईनचे कामाव्यतिरिक्त कोणतेच काम पूर्ण केले नाही.परिणामी ही योजना शोभेची ठरली असून गावाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

अंदाजपत्रकानुसार गावात पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईनचे काम करणे सक्तीचे होते.मात्र नियम धाब्यावर बसवत ठेकेदाराने दलित वस्तीत पाईपलाईनचे काम न करताच जुन्याच लाईनला एक दोन ठिकाणी एक दोन पाईप टाकून जोडून दिले आहे. मात्र, निधी काढून घेतला आहे.याबाबत मागणी करूनही दलित वस्तीत काम केले जात नसल्याने येत्या पंधरा दिवसात येथील ग्रामस्थ पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे सांगितले. विहिर खोलीकरण व कडे बांधकाम, पाणीटाकी दुरुस्ती,विहिरीवरील पंप हाउस,समान पाणी वाटप योजना आदि महत्वाची कामे अपूर्णच असून गेल्या चार वर्षांपासून मागणी करूनही पूर्ण केलेले नाही. 

टाळाटाळ केली जात असल्याने संबधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करून त्यांना शासनाने काळ्या यादीत टाकावे अशी मागणी सरपंच सविता शेळके,माजी सरपंच मारुती नेहरे,संजय शेळके,रवींद्र शेळके, राम शेळके,आनंदा शेळके यांनी केली आहे.
योजना आहे म्हणून टॅकर मिळत नाही.

गावाला कायमस्वरूपी पाणी पुरवठा करणारी योजना असल्याने प्रशासनाला येथे टॅकरने पाणीपुरवठा करता येत नाही.तर दुसरीकडे योजना पूर्ण होत नसल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे.परिणामी नियमांच्या कात्रीत अडकल्याने नसल्याने ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहे. 

“योजनेविषयी ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.ग्रामसेवकांना विचारणा केली असता त्यांनी सदर ठेकेदार येत्या पाच सहा दिवसात काम सुरु करून एक महिन्यात सदरचे काम पूर्ण करणार असल्याचे सांगितले. संबधित ठेकेदाराने काम पूर्ण न केल्यास आपण सदर ठेकेदारावर काळ्या यादीत टाकून गुन्हे दाखल करण्यास प्रशासनास विनंती करणार आहे.”

- सविता शेळके,सरपंच, ठाणगाव

Web Title: Thanga ganakaras facing water problem