
पोटाची खळगी भरण्यासाठी 'ते' देतात दगडाला आकार
तळोदा (जि. नंदुरबार) : हिंदी चित्रपटातील ‘दुनिया में रहना है तो काम करो प्यारे, वरना ये दुनिया जीने नहीं देगी - खाने नहीं देगी - पीने नहीं देगी' या गीतातील ओवी तळोद्यातील यात्रेत आलेल्या दगडू धोत्रे या ६६ वर्षीय वृद्धावर चपखलपणे बसत आहेत.
पोटाची खळगी भरण्यासाठी संपूर्ण धोत्रे कुटुंब रणरणत्या उन्हात दगडाला आकार देण्याचे अवघड काम करीत आहे. त्यामुळे धोत्रे कुटुंबाच्या मेहनतीपासून विशेषतः वृद्ध दगडू धोत्रेंच्या जिद्दीपासून इतर नागरिक नक्कीच प्रेरणा घेतील यात शंकाच नाही. (The story of stone tools Makers)
आजच्या आधुनिक युगात घरातील स्वयंपाकगृहात अनेक नवनवीन यांत्रिक उपकरणे आली असली तरी खेड्यांमध्येच नव्हे तर गाव व शहरातही काही प्रमाणात आजही पाटा-वरवंटा, खलबत्ता यासारख्या दगडी वस्तू वापरात आहेत. त्यामुळेच अशा दगडी वस्तू लीलया घडविणाऱ्या पाथरवटांची कला आजही थोड्याफार प्रमाणात का होईना पण जिवंत आहे. आजही तळोद्यासह जवळच्या अक्कलकुवा, धडगाव तालुक्यात खलबत्ते, पाटा-वरवंटा आदी दगडी वस्तूंना मागणी आहे. त्यामुळेच तळोद्यातील कालिका मातेचा यात्रेत म्हसावद (ता. एरंडोल, जि. जळगाव) येथून असेच दगडापासून वस्तू घडविणारे दगडू धोत्रे व त्यांच्या कुटुंबातील युवराज धोत्रे, लीलाबाई धोत्रे व इतर सदस्य व्यवसायासाठी लांबून यात्रेत आले आहेत.
हेही वाचा: महागाई सोसवेना; नाशिकमध्ये साडेचार लाखाचे खाद्यतेल चोरीला
चोखंदळ खवय्यांची पाटा-वरवंट्याला पसंती
गेल्या दहा दिवसांपासून रणरणत्या उन्हात घामाचा धारा पुसत जाते, खलबत्ते, दिवा (चाड), पाटा-वरवंटा आदी दगडी वस्तू मोठ्या कष्टाने स्वतः घडवून, त्यांची विक्री करीत त्यातून आपल्या पोटाची भूक संपूर्ण धोत्रे कुटुंब शमवित आहे. उन्हाळ्यात वेगवेगळ्या गावी, तालुक्याच्या ठिकाणी, बाजारपेठा किंवा मोक्याच्या जागी व्यवसाय करण्यासाठी धोत्रे कुटुंब जात असते. राहण्याची कुठलीही सोय नाही, काम केलं तर जेवण मिळेल अश्या परिस्थितीतही धोत्रे कुटुंब ज्याठिकाणी जातात, त्याठिकाणी जिद्दीने, अथक परिश्रम घेत आपला संसाराचा गाडा हाकलत असतात. दरम्यान आधुनिक तंत्रज्ञानाचा काळात अश्या दगडी वस्तूंना कमी मागणी असल्याने काही कुटुंबांनी हा व्यवसाय सोडला आहे. मात्र धोत्रे कुटुंबाने आपला पिढ्यान् पिढ्या चालत आलेला हा व्यवसाय आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आजही मोठ्या जिद्दीने पुढे चालू ठेवला आहे.
चोखंदळ खवय्ये देतात प्राधान्य गावाकडून शहराकडे गेलेल्या अनेकांच्या घरी आजही पाटा-वरवंटे, जाती, उखळ याचा वापर केला जातो. कारण जात्यावर दळलेल्या पिठाची भाकरी, खलबत्यामध्ये कुटलेला मसाला किंवा पाटा-वरवंट्यावर स्वयंपाकासाठी हाताने तयार केलेल्या मसाल्याचे वाटण याने जेवणाची लज्जत वाढते. तसेच अधूनमधून चव बदलण्यासाठी आजही काही चोखंदळ खवय्ये दगडी वस्तूंनाच प्राधान्य देतात.
हेही वाचा: मांजरीचे पिल्लू समजून चिमुकल्यांनी खेळवले बिबट्याचे बछडे
''घराण्यात ही कला व व्यवसाय वंशपरंपरेने चालत आलेला आहे. यांत्रिकीकरणाच्या युगात घरगुती जाते, पाटा, उखळ, दिवा, गोलवाला खलबत्ता, टोपीवाला खलबत्ता या वस्तूंऐवजी मिक्सर, ग्राइडंवृदरचा वापर वाढल्याने आमच्या पारंपारिक व्यवसायावर मोठा परिणाम झाला. मात्र जीवन चरितार्थासाठी आजही हा व्यवसाय आवडीने करीत आहे.'' - दगडू धोत्रे, व्यावसायिक
Web Title: The Story Of Stone Tools Makers Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..