esakal | धुळ्यात चोरांची धाडसी चोरी; भरदुपारी दहा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास 
sakal

बोलून बातमी शोधा

धुळ्यात चोरांची धाडसी चोरी; भरदुपारी दहा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास 

चोरट्यांनी भरदुपारी एक ते दोनच्या सुमारास दरवाजाचा कडीकोयंडा तोडून प्रवेश केला.

धुळ्यात चोरांची धाडसी चोरी; भरदुपारी दहा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी


धुळे : शहरातील देवपूरमधील बिलाडी रोडवरील उड्डाणपुलालगत असलेल्या राधाकृष्ण कॉलनीतील प्लॉट क्रमांक ५० मध्ये चोरट्यांनी शनिवारी (ता. १६) भरदुपारी धाडसी चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. चोरट्यांनी दहा ते बारा तोळे सोनेचांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली. याबाबत तपासासह रात्री उशिरापर्यंत देवपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते. 

आवश्य वाचा- मुंबईला रेल्वेने निघाले आणि लाख रुपये गमावून बसले !

राधाकृष्ण कॉलनीतील जिजाबराव शिरसाट मालेगाव रोडवरील खासगी रुग्णालयामधील मेडिकल दुकानावर कामाला आहेत. त्यांच्या पत्नी शनिवारी कॉलनीतच साडी खरेदीसाठी गेल्या होत्या. एक मुलगा शेतीकामाला तर दुसरा दहावीत असल्याने क्लासला गेला होता. त्यांच्या घरी कोणीच नसल्याचे हेरून चोरट्यांनी भरदुपारी एक ते दोनच्या सुमारास दरवाजाचा कडीकोयंडा तोडून प्रवेश केला. त्यांनी कपाटातील सहा तोळ्याची मंगलपोत, प्रत्येकी दोन तोळ्याची अर्धमाळ, नेकलेस, एक तोळ्याचा लक्ष्मीहार, अकरा ग्रॅमचे कानातील टोंगल तसेच वीस ते पंचवीस हजार रुपये रोख, असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. 

आवर्जून वाचा- एकटा रडत बसलेला पाहून प्रवाशांना आली शंका; पोलीस आले आणि लावला शोध !
 

या घरामागे असलेल्या मंडप व्यावसायिकाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्यांची छबी कैद झाली आहे. यात दोन चोरटे विनाक्रमांकाच्या कारने आल्याचा संशय आहे. माहिती मिळताच देवपूर पोलीस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक चंद्रकांत पाटील, उपनिरीक्षक राजेंद्र माळी, पोलीस नाईक शशी देवरे, मुकेश वाघ, बंटी साळवे, अखडमल, मिस्तरी, राजपूत, ब्राम्हणे व ठसे तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. त्याने दोनशे ते अडीचे फुटापर्यंत माग काढला. भरदुपारी झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे