विरोधकांकडून केवळ प्रेमापोटी गुणगान - एकनाथराव खडसे  

विरोधकांकडून केवळ प्रेमापोटी गुणगान - एकनाथराव खडसे  

भुसावळ - भाजपात कुठलाही गटतट नाही. हे केवळ माध्यमांनी रंगविलेले चित्र आहे. त्यामुळे पक्ष सोडण्याचा प्रश्‍नच येत नाही. मी कुठल्या पक्षात जावे यासाठी विरोधक स्तुती करीत नाही, तर मी सर्वांनाच आवडतो त्यामुळे माझ्या प्रेमापोटी विरोधक गुणगान करीत असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले. 

भुसावळ येथे प्रा. सुनील नेवे यांच्या निवासस्थानी काल आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या पाच वर्षांत खासदार रक्षा खडसे यांनी लोकसभेत अनेक प्रश्‍न मांडले. रेल्वे, महामार्गासह केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून दिला. केलेल्या कामाचा वृत्तांत जनतेपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्यवृत्तांत प्रकाशन केले जाणार असल्याचे आमदार खडसे यांनी सांगितले. 

आगामी लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे यांचे तिकीट कापण्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगविली जाते. मात्र, उमेदवारीचा अंतिम निर्णय संसदीय मंडळ घेत असते. "चिल्लर' लोकांना यातले काही एक माहिती नसते, ते केवळ मनोरंजनात्मक चर्चा पसरविण्याचे काम करीत असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. 

"मौनी' खासदार भाजपाचे नव्हे..! 
यापूर्वीचे खासदार हे मौनी होते. त्यामुळे तेव्हा खासदार दाखवा अन्‌ हजार रुपये मिळवा. अशी घोषणा करावी लागे. असे वक्तव्य आमदार खडसे यांनी काल जळगाव येथे झालेल्या भाजप मेळाव्यात केले होते. याबाबत खुलासा करताना श्री. खडसे म्हणाले की, हे वक्तव्य पक्षाच्या खासदारांसाठी नव्हे, तर जिल्ह्यात भाजपाचे खासदार निवडून येण्यापूर्वीची ही स्थिती होती. पूर्वीचे खासदार हे आपल्या मतदारसंघात फिरकतही नव्हते. त्यामुळे हे विधान पक्षाच्या खासदाराविरुध्द नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

राजधानीला लवकरच थांबा 
राजधानी एक्‍स्प्रेसचे काही निकष आहेत, त्यानुसारच गाडीला थांबे देण्यात आले. यासाठी सर्वप्रथम पाठपुरावा आपणच केला. तत्कालीन रेल्वेमंत्री सदानंद गौडा होते, तेव्हापासून आतार्पंत आठ वेळा पत्रव्यवहार केला. यात काही तांत्रिक अडचणी येत असल्याने मंजुरी मिळत नव्हती. आता भुसावळ येथे तांत्रिक थांबा देण्याचे मान्य करण्यात आले आहे. तर 16 फेब्रुवारीपासून भुसावळ- मुंबई नवीन रेल्वे सुरू केली जाणार आहे. ही गाडी संध्याकाळी भुसावळ येथून रवाना होईल. नंदूरबार, दोंडाईचा, उधना मार्गे बांद्रा येथे पोहणार असल्याचे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com