हजारो क्विंटल कांदा भावाअभावी शेतातच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 मार्च 2019

हमीभावाचा विषय हवेतच विरलाय. ज्यांना भाडोत्री वाहन करून कांदा विकावा लागतोय; त्यांच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही, ही वास्तविकता सरकारने लक्षात घ्यावी.
- महेश मढवई, शेतकरी

चिचोंडी (जि. नाशिक) - लोकसभा निवडणुकीमुळे शेतमाल विक्रीला परवडेल असा भाव राहील, अशी भाबडी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे भाव कमालीचे घसरल्याने शेतकरीवर्ग नाराज असून, मोठ्या कष्टाने दिवसरात्र राबून पिकविलेला कांदा कवडीमोल विकण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे, रांगडा कांदा जास्त दिवस टिकत नसल्याने पोळ घालून पडलेला कांदा सडण्याची भीती निर्माण झाली आहे.

यंदा कमी पाणी असले, तरी या वेळी चांगली थंडी पडल्याने कांदा पिकावर रोगाचा फारसा प्रादुर्भाव झाला नाही. परिणामी, माल चांगला निघाला. मात्र, उन्हाळ कांद्याला लागलेली साडेसाती लाल कांद्यावरही राहिल्याने सुरवातीपासून या वर्षी तो कवडीमोल विकावा लागला. यामुळे शेतकरीवर्गास विक्रीसाठी नेलेल्या मालाच्या पैशांतून गाडीभाडे देणेही अवघड बनले आहे. रांगडा कांद्याची टिकवण क्षमता कमी आहे. कडक ऊन पडू लागल्याने व उकाडाही वाढल्याने कांदा सडण्याची भीती आहे. एकीकडे विक्रीस घेऊन जावे तर कवडीमोल, की ज्याने खर्चही फिटत नाही, तर उन्हात असल्याने व टिकाऊ माल नसल्याने सडण्याची भीती, अशा दुहेरी संकटात लाल कांदा आहे. काही शेतकऱ्यांनी मातीमोल मिळणाऱ्या भावामुळे कुठे उकिरड्यात, तर कुठे जनावरांपुढे फेकला. काही शेतकऱ्यांनी खत होईल म्हणून शेतात पसरून देत त्याची नांगरणी केली. 

उन्हाळ व लाल कांदा कवडीमोलाने विकल्यानंतर शेतकऱ्यांनी व विरोधकांनी केलेल्या आंदोलनानंतर एक नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत विकलेल्या कांद्याला दोनशे रुपये 

प्रतिक्विंटल अनुदान सरकारने जाहीर केले. त्यानंतरही कांद्याचे भाव न वाढल्याने दुसऱ्या टप्प्यात १५ डिसेंबर ते ३१ जानेवारीपर्यंत विक्री केलेल्या कांद्यालाही अनुदान जाहीर केले. मात्र, अद्याप काही बाजार समित्यांचे अनुदान जमा झाले नसल्याने शेतकरी कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

हमीभावाचा विषय हवेतच विरलाय. ज्यांना भाडोत्री वाहन करून कांदा विकावा लागतोय; त्यांच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही, ही वास्तविकता सरकारने लक्षात घ्यावी.
- महेश मढवई, शेतकरी

Web Title: Thousands of quintal onions are desirable in the field