गैरव्यवहारात गुजराती व्यापाऱ्यांचे हितसंबंध - पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

नाशिक - तूरडाळ गैरव्यवहारात गुजराती व्यापाऱ्यांचे हितसंबंध जोपासण्यात येत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केला. तसेच अतिरिक्त उत्पादन असतानाही आयातीचा निर्णय का घेतला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

नाशिक - तूरडाळ गैरव्यवहारात गुजराती व्यापाऱ्यांचे हितसंबंध जोपासण्यात येत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केला. तसेच अतिरिक्त उत्पादन असतानाही आयातीचा निर्णय का घेतला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आफ्रिकेत गेले आणि पाच वर्षे तूरडाळ आयातीचा निर्णय घेतला आहे, याकडेही चव्हाण यांनी लक्ष वेधले. "कॉफी वुईथ सकाळ' उपक्रमातंर्गत चव्हाण यांनी "सकाळ'च्या संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी आज संवाद साधला. केंद्र आणि राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांचा पाढा वाचताना ते म्हणाले, 'भ्रष्टाचाराच्या विरोधात कॉंग्रेसतर्फे आघाडी उघडण्यात येणार आहे.

लढाऊ विमानांच्या खरेदीत 50 टक्के माल देशातून खरेदी केला जावा, अशी अट होती; पण एच.ए.एल.ला डावलून उत्पादनाचा अनुभव नसलेल्या अनिल अंबानींच्या कंपनीला काम दिले गेले. 126 ऐवजी 36 विमाने खरेदी करण्यासाठी प्रत्येक विमानामागे एक हजार कोटी अधिक दिले गेले. त्यातून तयार झालेल्या प्रश्‍नांमुळे 36 हजार कोटी रुपये कोठे गेले? की पैसा हाताळण्यासाठी अनिल अंबानींना आणले गेले, याचे उत्तर पंतप्रधानांनी द्यायला हवे. तसेच ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या समितीचा अहवाल सरकारकडे असून, रेल्वेच्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी एक लाख कोटी खर्च अपेक्षित आहे. त्याऐवजी जपानकडून एक लाख दहा हजार कोटी रुपये बुलेट ट्रेनसाठी खर्च करण्याचे ठरवले आहे. रोज दोन कोटी 70 लाख प्रवासी रेल्वेने प्रवास करतात आणि दरवर्षी चौदा हजार जण दगावतात. त्यात मुंबईतील तीन हजारांचा समावेश असतो. ही सारी परिस्थिती पाहिल्यावर भ्रष्टाचाराचा उबग आल्याखेरीज राहत नाही.''

नवी मुंबईतील सिडकोतील 24 एकरांचा भूखंड आठ शेतकऱ्यांच्या नावावर करण्यात आला. ही जागा वितरित होण्याअगोदर खरेदी करार झाला. दीड हजार कोटींची जागा 350 कोटींना विकसकांना देण्यात आली. ही अनियमितता मांडल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करार रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिकांच्या "सोनेरी टोळी'ची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. शिवाय सचिवांनी अनियमितता आहे, असे म्हटलेले असतानाही गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी मुख्यमंत्र्यांना अवगत करून निर्णय घेतला असल्याने महेता यांना मंत्रिपदावरून जावे लागेल, असा दावा चव्हाण यांनी केला.

'सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांनी स्वागत केले. आमदार डॉ. सुधीर तांबे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, कॉंग्रेसच्या प्रवक्‍त्या डॉ. हेमलता पाटील, शहराध्यक्ष शरद आहेर आदी उपस्थित होते.

लढाऊ विमानांच्या खरेदीत 50 टक्के माल देशातून खरेदी केला जावा, अशी अट होती; पण एच.ए.एल.ला डावलून उत्पादनाचा अनुभव नसलेल्या अनिल अंबानींच्या कंपनीला काम दिले गेले.
- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

Web Title: Toordal Scam Gujrat Businessman Involve Prithviraj Chavan