३५ किलोमीटरच्या रस्त्यात ६२ 'स्पीडब्रेकर्स'!

अंबादास देवरे
सोमवार, 30 एप्रिल 2018

सटाणा : सटाणा - मालेगाव या राज्यमार्गावरील अवघ्या ३५ किलोमीटर अंतरासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून तब्बल ६२ ठिकाणी अनावश्यक गतिरोधक टाकून एक विक्रमच प्रस्थापित केला आहे. या गतिरोधकांमुळे सर्वच दुचाकी व चारचाकी वाहनधारकांसह सर्वसामान्य प्रवाशांची हाडे खिळखिळी होत असून वाहतुकीत सुरक्षितता येण्याऐवजी वाहतूक असुरक्षित वाटू लागली आहे.

सटाणा : सटाणा - मालेगाव या राज्यमार्गावरील अवघ्या ३५ किलोमीटर अंतरासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून तब्बल ६२ ठिकाणी अनावश्यक गतिरोधक टाकून एक विक्रमच प्रस्थापित केला आहे. या गतिरोधकांमुळे सर्वच दुचाकी व चारचाकी वाहनधारकांसह सर्वसामान्य प्रवाशांची हाडे खिळखिळी होत असून वाहतुकीत सुरक्षितता येण्याऐवजी वाहतूक असुरक्षित वाटू लागली आहे.
सटाणा - मालेगाव दरम्यानच्या ४५ ते ६० मिनिटांच्या अंतरासाठी आता अनावश्यक गतिरोधकांमुळे तब्बल दीड ते पावणे दोन तास नाहक वेळ खर्ची पडत असून वाहनचालकांना अतिरिक्त इंधनाचा भुर्दंडही सोसावा लागत आहे. या एकाही गतिरोधकावर पांढरे पट्टे किंवा रस्त्याच्या कडेला गतिरोधक असल्याचा सूचनाफलक नसल्याने अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे सिद्ध झाले आहे. या एकूणच प्रकारामुळे सार्वजनिक वाहतूक विभाग टीकेचे लक्ष बनले आहे. 

सटाणा - मालेगाव या राज्यमार्गावर गेल्या काही वर्षांपासून खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने राज्यमार्गाची दुरुस्ती करावी अशी जनतेची मागणी होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने थेट मालेगाव पर्यंतचा महामार्ग दुपदरी केला. हे करताना आवशयक तेथे पुलाचे बांधकाम करून सुरक्षा भिंतीही उभारल्या. आता हा रस्ता खरोखर राज्यमार्ग वाटू लागला असतानाच सर्वोच्च न्यायालयाने रस्ता तयार करताना लागू केलेले निकष डावलून सार्वजनिक बांधकाम विभागाने ३५ किलोमीटर अंतरासाठी ६२ विविध ठिकाणी अनावश्यक गतिरोधक तयार केले आहे. हे गतिरोधक सध्या सर्वांची प्रमुख डोकेदुखी बनले आहेत. 

रस्त्याच्या कडेला असलेले शासकीय कार्यालय, शाळा महाविद्यालयाच्या इमारती, चौफुली या ठिकाणी भरधाव वेगात असलेल्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधक असणे आवश्यक आहे. बांधकाम विभागाने मात्र नद्या, नाले, शिवार वस्त्या, वळण रस्ता आदी अनावश्यक ठिकाणी अशास्त्रीय उंची व रुंदी असलेले गतिरोधक बसवून जणू काही अपघातांनाच निमंत्रण दिले आहे.

या गतिरोधकांची उंची जास्त असल्याने एस. टी. बसेससह चार चाकी वाहनांचे स्प्रिंग पाटे तुटण्याचे प्रमाण वाढले असून दुचाकी वाहनचालकांना पाठ, कंबर व मणके दुखीचा त्रास सुरु झाला आहे.  

गतिरोधक तयार केल्यानंतर त्याच्यावर नियमानुसार पांढरे पट्टे किंवा पाच ते दहा मीटर अगोदर रेडीअम रिफ्लेक्टर असलेला सूचना फलक नसल्याने दिवसा व रात्री वाहनचालकांना गतिरोधकाचा कोणताही अंदाज येत नाही. दुचाकी वाहनचालक वेगाने या गतिरोधकापर्यंत पोहोचताच वेग नियंत्रणात आणण्याआधी वाहन गतिरोधकावर वरखाली आदळते. त्यातच एकीकडे तोंड करून बसलेल्या महिला प्रवाशांचा तोल जाऊन अपघात घडण्याचा प्रकार नित्याचाच झाला आहे.

चारचाकी वाहनचालक वाहनाचा वेग नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नात असतानाच अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागील वाहन पुढील वाहनावर जोरात जाऊन आदळते व मोठा अपघात घडतो. हे प्रकार दर दोन किलोमीटर अंतरावर बघावयास मिळतात. 
सटाणा - मालेगाव या रस्त्यावरील वाहनांची गर्दी आणि वाढलेले अपघात यावर काही अंशी नियंत्रण ठेवण्यासाठी हे गतिरोधक अत्यावश्यकच आहेत. पण ते करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीनच संकटे ओढवून घेण्यात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. परिणामी या गतिरोधकांबद्दल वाहनचालकांच्या मनात असुरक्षिततेची भावना पसरली आहे.

* सटाणा - मालेगाव राज्यमार्गावर धावणाऱ्या सर्वच एस. टी. बसेसचे स्प्रिंग पाटे तुटणे व डिस्क बेंड होण्याचे प्रमाण वाढले असून अतिरिक्त इंधनाचा भार सोसावा लागत आहे, त्यामुळे बसेसवरील अनुषंगिक खर्च वाढला आहे. 
                      - सटाणा आगार प्रशासन
* या रस्त्यावरील गतिरोधकांच्या बांधकामावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे कोणतेही नियंत्रण नाही. रस्ता तयार करणारे ठेकेदार रस्त्यांवरील गतिरोधकाचे काम नियमानुसार करीत आहेत की नाही, यावर शासकीय अधिकाऱ्यांची नजर असणे आवश्यक आहे. मात्र, अशा अनावश्यक व अपघातांना निमंत्रण देणाऱ्या गतिरोधकांमुळे अधिकाऱ्यांचे ठेकेदारांच्या कामाकडे दुर्लक्ष असल्याचेच चित्र दिसत आहे.

Web Title: Total 62 speed breakers in 35 km road