आदिवासी बांधवांवर रोजगारासाठी स्थलांतराची वेळ; पाडे पडले ओस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

घर चालविण्याकरिता काम मिळत नसल्याने त्यांच्याकडे स्थलांतराशिवाय पर्याय उरलेला नाही. स्थलांतरामुळे आदिवासी बांधवांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

पळसन (जि. नाशिक) : सुरगाणा तालुक्‍यातील आदिवासी बांधवांवर रोजगारासाठी स्थलांतराची वेळ आली आहे. स्थलांतरामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर गंडांतर आलेले आहे. सुरगाणा तालुक्‍यातील 168च्या आसपास महसुली गावे आहेत. वाडे-पाडे धरले तर तीनशेच्या आसपास आहेत. या सर्व गावांतून स्थलांतर झाल्याचे चित्र सध्या तालुक्‍यात दिसत आहे. 

पळसन, भवाडा, बाऱ्हे, उंबरदे, उंबरठाण, बरडीपाडा, ठाणगाव, जाहुले, मनखेड, पिपळसोंड, गोंदुणे, खुंटविहीर, वांगण, आमदा, गहाले, खडकमाळ, पळशेत या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज वास्तव करतो. त्याचा मुख्य व्यवसाय भातशेती आहे.

मात्र, भातशेतीवर उपजीविका होत नसल्याने त्यांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागत आहे. यामुळे येथील स्थानिक आदिवासी रोजगारासाठी दिंडोरी, पिंपळगाव, निफाड, विंचूर, नाशिक, चांदवड, वणी, खेडगाव, जानोरी, लखमापूर तसेच गुजरातमध्ये कामासाठी स्थलांतरित होत आहेत. 

घर चालविण्याकरिता काम मिळत नसल्याने त्यांच्याकडे स्थलांतराशिवाय पर्याय उरलेला नाही. स्थलांतरामुळे आदिवासी बांधवांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. लहान बालके अंगणवाडीपासून वंचित राहतात. येथील ग्रामीण भागातील मुले सर्वांत जास्त अशिक्षित आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tribal community migrated for employment