मंदिराचा गाभारा खुला; पण महिलांची पाठच 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 एप्रिल 2017

त्र्यंबकेश्‍वर मंदिरात नियमाप्रमाणे सोपस्कार करून भाविकांना प्रवेश दिला जातो. महिलांना दर्शन खुले झाल्यापासून सकाळी सहा ते सात या वेळेत महिलांना मुक्त प्रवेश आहे; पण गर्भगृहातील दर्शनासाठी महिलांचा प्रतिसाद नसल्याचे मंदिरातील महिला विश्‍वस्तांचे म्हणणे आहे.
- ललिता शिंदे, विश्‍वस्त, त्र्यंबकेश्‍वर देवस्थान ट्रस्ट

नाशिक - त्र्यंबकेश्‍वरला ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी महिलांना गाभाऱ्यात प्रवेश मिळावा, यासाठी गेल्या वर्षी जोरदार आंदोलन झाले. मात्र, तृप्ती देसाई यांच्या आंदोलनानंतर अनेक महिन्यांत महिलांची कधीही दर्शनाला गर्दी झाली नाही. तीन तीन तास रांगेत उभे राहून दर्शनाला महिलांची गर्दी होते. पण महिलांसाठीच्या राखीव वेळेत महिला फिरकत नसल्याचे चित्र आहे. 

शनिशिंगणापूरला शनिचौथऱ्यावर आणि त्र्यंबकेश्‍वर मंदिरात गर्भगृहात महिलांना प्रवेश दिला जात नसल्याच्या अन्यायी प्रथेविरोधात तृप्ती देसाई यांनी गेल्या वर्षी आंदोलन केले. महिला समानतेच्या मुद्द्यावर न्यायालयात लढाई करून महिलांच्या प्रवेशासासाठी हक्क मिळविला. सुरवातीला दोन्ही ठिकाणच्या देवस्थान ट्रस्टच्या विरोधामुळे महिलांच्या दर्शनाला विरोध झाला. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर हा विषय सौम्य झाला. न्यायालयीन आदेश म्हणून दोन्ही ठिकाणच्या देवस्थानांनी विरोधाची भूमिका मवाळ केली. देसाई यांच्यासह त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी शनिचौथऱ्यावर, तसेच त्र्यंबकेश्‍वर मंदिरात प्रवेश मिळविला.

महिलांच्या प्रवेशावरील निर्बंध उठल्यानंतर मंदिरात पूर्वीप्रमाणेच दर्शनासाठी रांगा कायमच आहेत; पण त्यात महिलांचा प्रवेश हा विषय पूर्वीच्या पारंपरिक प्रथेप्रमाणेच आहे. दोन्ही ठिकाणच्या मंदिरांत येणाऱ्या हजारो भाविकांच्या गर्दीत स्वतंत्रपणे दर्शनासाठी आग्रह धरणाऱ्या महिलांची संख्या जवळपास नाहीच. त्यामुळे महिलांना दर्शनाचा हक्क मिळाला म्हणून महिलांनी चौथऱ्यावर जाऊन किंवा त्र्यंबकेश्‍वरच्या गर्भगृहात जाऊन दर्शन घ्यायला सुरवात केली, असे चित्र अजिबात नाही. किंबहुना दर्शनासाठी कवाडे उघडली, तरी महिलाच त्याचा वापर करीत नसल्याचे, किंबहुना दर्शनाच्या रोजच्या रांगेतील महिलांना त्याविषयी रस नसल्याचे चित्र आहे.

Web Title: Tryambakeshwar Temple