लोहोणेरच्या शेतकऱ्यास कर्जासाठी 18 लाखांना फसविणारे दोघे गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

नाशिक - लोहोणेर (ता. देवळा) येथील शेतकऱ्यास पाच कोटी कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून साडेअठरा लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघा संशयितांना गंगापूर पोलिसांनी अटक केली. राकेश बापू पानपाटील (33, रा. अस्मिता बंगला, प्रियंका पार्क, गाढवे पेट्रोल पंपासमोर, जगतापनगर, सिडको), आकाश विजय सोनवणे (23, रा. कंगण सोसायटी, जयभवानी रोड, नाशिक रोड) अशी दोघा संशयितांची नावे असून, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

धनंजय एकनाथ महाजन (रा. लोहोणेर, ता. देवळा) यांच्या फिर्यादीनुसार ते शेतकरी असून, त्यांना कर्जाची आवश्‍यकता होती. त्यांना त्यांच्या परिचयातील मित्राने संशयित राकेश पानपाटील, आकाश सोनवणे या दोघांशी ओळख करून दिली होती. संशयित पानपाटील, सोनवणे यांनी धनंजय महाजन यांना पाच कोटींचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी संशयितांनी मुंबई येथील बालाजी फायनान्स कंपनीकडून पाच कोटी 23 लाखांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगत संशयितांनी महाजनांचा विश्‍वास संपादन करत त्यांना त्या रकमेचा धनादेशही दिला. प्रोसेसिंग फीपोटी महाजन यांच्याकडून 18 लाख 60 हजार रुपये घेतले. महाजन यांनी बॅंकेत पाच कोटींचा धनादेश वटविण्यासाठी टाकला असता तो बनावट असल्याचे आढळले. शिवाय धनादेशावरील बॅंक खातेच अस्तित्वात नसल्याचे बॅंकेने सांगितले. याप्रकरणी 9 ऑगस्टला गंगापूर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर मोरे, उपनिरीक्षक समीर वाघ यांच्या पथकाने तांत्रिक माहितीआधारे सातपूर औद्योगिक वसाहतीत संशयित पानपाटील व सोनवणे या दोघांना अटक केली. संशयितांकडून गुन्ह्यातील 18 लाख 60 हजारांची रोकड, विधानसभा आमदार असे चिन्ह असलेली सात लाखांची टाटा सफारी कार (एमएच 15 इबी 144), 30 हजारांचा आयफोन, दहा कोटी व एक कोटी 25 लाख रुपये लिहिलेले बनावट धनादेश, विविध बॅंकांचे बनावट स्वाक्षरी असलेले बनावट धनादेश असा सुमारे 25 लाख 90 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. कारवाईत हवालदार माणिक गायकर, कैलास भडिंगे, दत्ता गायकवाड, नितीन नेटारे, तुषार देसले, केशव ढगे, सचिन सुपले यांचा सहभाग होता. 

Web Title: Two arrested cheats to the farmer for cheating 18 lakhs of loan