ग्रामपंचायतीच्या निधीवर डल्ला मारल्याने सरपंचासह दोन सदस्य अपात्र  

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

येवला : पाटोदा ग्रामपंचायतीच्या सरपंचासह दोन सदस्यांनी नियमबाह्य कामकाज करून कुटुंबाचा आर्थिक फायदा केल्याचे सिद्ध झाल्याने अप्पर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांनी या तिघांना अपात्र घोषित केले आहे. सरपंच अनिता धनवटे, सदस्य सुलताना मुलतानी व कौतिक वाघ ही तिघे अपात्र झालेले सदस्या असून या निकालाने ठेकेदारी करणाऱ्या सदस्यांना चांगलाच चाप निर्माण झाला आहे.

येवला : पाटोदा ग्रामपंचायतीच्या सरपंचासह दोन सदस्यांनी नियमबाह्य कामकाज करून कुटुंबाचा आर्थिक फायदा केल्याचे सिद्ध झाल्याने अप्पर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांनी या तिघांना अपात्र घोषित केले आहे. सरपंच अनिता धनवटे, सदस्य सुलताना मुलतानी व कौतिक वाघ ही तिघे अपात्र झालेले सदस्या असून या निकालाने ठेकेदारी करणाऱ्या सदस्यांना चांगलाच चाप निर्माण झाला आहे.

येथील सरपंच अनिता धनवटे यांनी दीर सुनील धनवटे यांच्या नावावर कॉंक्रेटीकरण, भूमिगत गटार आदी कामांच्या नावाखाली ७४ हजाराची रक्कम काढली. तर सदस्य मुलतानी मुलाणी यांनी मुलगा रियाज मुलानी यांच्या नावावर वेगळ्या वेगळ्या कामाच्या बदल्यात २ लाख १५ हजार इतकी रक्कम काढली.  दुसरे सदस्य कौतिक वाघ यांनी रस्ता काँक्रिटीकरण पोटी २१ हजार रुपयांचा धनादेश ग्रामपंचायत मधून काढला आहे. याशिवाय गावात अनेक हार्डवेअर व कृषी उद्योगाची दुकाने असताना धनवटे यांनी पतीच्या दुकानातून जादा दराने साहित्य खरेदी केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य साहेबराव बोराडे, संपत बोरनारे, तुकाराम पिंपरकर, दिलीप बोराडे,दिलीप बोरनारे, चंद्रकला चंद्रभान नाईकवाडे, अश्विनी बाबासाहेब भुसारे, शबीना मुबारक शेख यांनी केली होती.

या तक्रारीनुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी कळवणच्या गटविकास अधिकाऱ्यांमार्फत सविस्तर चौकशी करून घेतली होती. या चौकशीत धनवटे यांनी पतीच्या दुकानातून साहित्य खरेदी केल्याचे व सिमेंटच्या गोण्यांचे वाढीव दर लावल्याचे तर तत्कालीन उपसरपंच मुलांनी यांच्या मुलगा मुलानी व सदस्य वाघ यांच्याकडे कुठलाही ठेकेदारीचा परवाना नसताना ग्रामपंचायतीने निविदा न काढता व कोटेशन न मागविता त्यांना कामे दिल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी अहवाल पाठवून कारवाईची शिफारस केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून व बाजू मांडण्याची संधी दिल्यानंतर कायदेशीर तरतुदीनुसार या तिघांना अपात्र ठरविण्याचे आदेशात म्हटले आहे.

ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता तसेच आर्थिक निधीचा लाभ घेतला म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. तालुक्यातील दुसऱया क्रमांकाची सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून पाटोद्याकडे पाहिले जातेय. १७ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सदस्यांवरच अशी कारवाई झाल्याने हा निकाल तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

Web Title: Two members with disqualifies with Sarpanch, after fraud in the grampanchayat fund