दोन शाळकरी मुलांचा मेहरुण तलावात बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

जळगाव - शहरातील जुने मेहरुण गावाच्या पिरजादे वाड्यात वास्तव्याला असलेल्या १३ व १४ वर्षीय दोन शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. घराजवळ लग्नाची पंगत झाल्यावर एकत्र आलेल्या समवयस्क मुलांनी तलावात पोहण्याचा बेत आखला होता. आठ-दहा मुलांचा घोळका तलावात पोहण्यासाठी उतरला. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज चुकल्याने एकामागून एक दोघे तलावात बुडाले. 

जळगाव - शहरातील जुने मेहरुण गावाच्या पिरजादे वाड्यात वास्तव्याला असलेल्या १३ व १४ वर्षीय दोन शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. घराजवळ लग्नाची पंगत झाल्यावर एकत्र आलेल्या समवयस्क मुलांनी तलावात पोहण्याचा बेत आखला होता. आठ-दहा मुलांचा घोळका तलावात पोहण्यासाठी उतरला. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज चुकल्याने एकामागून एक दोघे तलावात बुडाले. 

शहरातील मेहरुण परिसरात लग्नाची पंगत (दावत-ए-वलिमा) असल्याने पिरजादे वाड्यातील लग्नात एकवटलेल्या दहा ते पंधरा वर्षीय शाळकरी मुलांच्या घोळक्‍याने तलावात पोहण्याचा बेत आखला. आठ ते दहा मुले सोबत पोहण्यासाठी तलावात गेले होते. त्यांच्यासोबत महम्मद दानिश महम्मद युसूफोद्दीन पिरजादे (वय १३) व खलिल अनिसुद्दीन पिरजादे (वय १४), (दोन्ही रा. पिरजादेवाडा, मेहरुण) हे दोघे पोहण्यासाठी तलावात उतरले होते. 

एकाला वाचविण्यात दुसराही बुडाला
दरम्यान, पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज चुकल्याने दानिश बुडू लागला. हे चित्र पाहून खलीलने त्याला ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही आत ओढला जाऊन दोघेही तलावात बुडाले. सोबत पोहणाऱ्यांनी पाण्यात शोध घेण्यास सुरवात केली, मात्र उपयोग होत नसल्याने काहींनी बाहेर येऊन आरोळ्या मारल्यावर तलावाकाठच्या असलेल्या गुराख्याने धाव घेतली. त्याचवेळी काफिल अहमद पिरजादे व जमील नवाज अकिलोद्दीन पिरजादे या दोघा शेतकऱ्यांनी धाव घेत तलावात उड्या घेतल्या. इतर मुलेही गटांगळ्या खात असल्याने त्यांना पाण्याबाहेर काढले. त्यांनी सांगितल्यानुसार त्या दिशेने दोघांचा शोध घेतल्यावर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. वाजीद फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेद्वारे दोन्ही मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्‍टरांनी तपासणीअंती दोघांना मृत घोषित केले. 

मेहरुणवासीयांनी घेतली धाव
पिरजादे वाड्यातील तरुण तलावात बुडाल्याचे वृत्त कळताच परिसरातील रहिवाशांनी तलावाच्या आणि जिल्हा रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. रेहान जहागीरदार, प्रशांत नाईक, अकील अहमद यांच्यासह दोनशेच्यावर तरुण जिल्हा रुग्णालयात एकवटले होते. मृतांच्या कुटुंबीयांना तोपर्यंत घटनेची माहितीच नसल्याने सुरवातीला त्यांच्या जवळच्या नातलगांना बोलावून घटना सांगण्यात आली. मृत्यूची माहिती कळताच दानिशच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला.

तलावावर सुरक्षा उपायांची मागणी 
मेहरुण तलावाचा परिसर प्रचंड मोठा आहे. चारही बाजूने तट मोकळे असल्याने पोहणाऱ्यांना मोह आवरला जात नाही. सध्या उन्हाळी सुट्या आणि लग्नसराईचा सीझन असल्याने लग्नकार्यानिमित्त परिसरात आलेल्या अल्लड पोरांचे घोळकेच्या घोळके तलावात पोहण्यासाठी येतात. बऱ्याच वेळेस त्यांना हटकलेही जाते, मात्र तरी न पोहता येणारेही तलावात उतरतात. मोठ्या प्रमाणावर गाळ काढला गेल्याने खोलीचा अंदाज येत नाही आणि पोहणारा बुडतो असे नगरसेवक इक्‍बाल पिरजादे यांनी सांगितले, तर तलावाकाठी दुर्बिणसह शिट्टी-काठी असलेला सुरक्षारक्षक नेमण्याची वारंवार मागणी करून महापालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते. प्रत्येक सहा महिन्यांत मोठी दुर्घटना होत असताना उपाययोजना होत नसल्याचे माजी उपमहापौर करीम सालार यांनी सांगितले.

खलिलचे आई-वडील बाहेरगावी
तलावात बुडून मृत्युमुखी पडलेला खलिल पिरजादे याच्या आईच्या भाचीचे चोपडा येथे निधन झाल्याने त्याचे संपूर्ण कुटुंबीय चोपडा येथे गेले होते. मात्र, खलिल घरीच असल्याने पोहायला गेला अन्‌ जीव गमावून बसला. चोपड्यात अंत्यसंस्कार आटोपल्यावर तेथेही जवळच्या नातलगांना केवळ तातडीने जळगावी निघून येण्याचा निरोप देण्यात आला. रात्री आठच्या सुमारास खलिलचे आई-वडील जळगावात आल्यावर घटना कळताच त्यांना जबर धक्का बसला. 

Web Title: two school boys death in mehrun lake