पोलिसाच्या गोळीबारात सावत्र मुलांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

पंचवटीतील पेठ रस्त्यावरील घरगुती वादातून पोलिस पित्याने शुक्रवारी दुपारी केलेल्या गोळीबारात सोनू ऊर्फ अभिषेक नंदकिशोर चिखलकर (२५), शुभम नंदकिशोर चिखलकर (२२) या सावत्र मुलांचा मृत्यू झाला.

नाशिक - पंचवटीतील पेठ रस्त्यावरील घरगुती वादातून पोलिस पित्याने शुक्रवारी दुपारी केलेल्या गोळीबारात सोनू ऊर्फ अभिषेक नंदकिशोर चिखलकर (२५), शुभम नंदकिशोर चिखलकर (२२) या सावत्र मुलांचा मृत्यू झाला.

संजय अंबादास भोये (५३, रा. पंचवटी) असे संशयित पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, घटनेनंतर तो स्वत: पंचवटी पोलिसात हजर झाला. तो उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हेशोध पथकात (डीबी) कार्यरत आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोये हे गुरुवारी (ता. २०) रात्रपाळी करून घरी आराम करत होते. त्यांच्या पत्नीला पहिल्या पतीपासून अभिषेक व शुभम ही मुले आहेत. तर भोये यांच्यापासून एक मुलगी व मुलगा आहे. शुभमचा विवाह गेल्या महिन्यात कळवण येथील निकिताशी झाला होता.

गेल्या दोन दिवसांपासून घरात वाद सुरू होते. आज दुपारीही वाद झाला. त्या वेळी रागाच्या भरात संशयित भोये यांनी त्यांच्याकडील सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून अभिषेक आणि शुभम या दोघांवर तीन गोळ्या झाडल्या. गोळी वर्मी बसल्याने अभिषेक जागीच गतप्राण झाला. शुभमला उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले, पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.

अभिषेक ऊर्फ सोनू हा मर्चंट नेव्हीमध्ये होता. एका महिन्याच्या सुटीवर घरी आला होता. येत्या दोन दिवसांत तो परत जाणारही होता.  शुभम यास दारूचे व्यसन असल्याने त्यावरून घरात सातत्याने वाद होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Son Death in Police Firing Crime