बोरी नदीवरील नवीन पुलाचे दोनदा नामकरण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

बोरी नदीवर पैलाड ते कसाली मोहल्ल्यास या भागाला जोडणारा नवीन पूल बांधण्यात आला आहे. या पुलाला शनिवारी सकाळी आमदार शिरीष चौधरी यांच्या उपस्थितीत ’लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूल’, तर आज पहाटे नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रसाद महाराजांच्या हस्ते ’संत सखाराम महाराज पूल’ असे नामकरण झाले.

अमळनेर - बोरी नदीवर पैलाड ते कसाली मोहल्ल्यास या भागाला जोडणारा नवीन पूल बांधण्यात आला आहे. या पुलाला शनिवारी सकाळी आमदार शिरीष चौधरी यांच्या उपस्थितीत ’लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूल’, तर आज पहाटे नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रसाद महाराजांच्या हस्ते ’संत सखाराम महाराज पूल’ असे नामकरण झाले. एकाच पुलास दोन नावे देण्यात आल्याने शहरात हा विषय चांगलाच चर्चिला जात आहे. आजी- माजी आमदारांचा नामकरण सोहळ्यावरून श्रेयवाद चांगलाच पेटला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून शांत असलेले शहर आता पुन्हा अशांततेच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. विविध विकासकामांवरून आजी- माजी आमदारांमध्ये नेहमीच चढाओढ होताना दिसून येत आहे. नुकताच प्रताप महाविद्यालयाजवळील मारवडकडे जाणाऱ्या नवीन उड्डाणपुलाला साने गुरुजी उड्डाणपूल असे नामकरण देण्यात आले. एकीकडे पालिका साने गुरुजी उड्डाणपुलाचे नामकरण करण्याबाबत स्थायी समितीत ठराव करते, तर दुसरीकडे खासदार ए. टी. पाटील व आमदार स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत नामकरण सोहळा पार पडला. हा वाद शमत नाही तोच संत सखाराम महाराज समाधी स्थळाजवळील पैलाड ते कसाली मोहल्ल्यास जोडणारा नवीन पुलाचा नामकरण सोहळा आमदार शिरीष चौधरी यांच्या उपस्थितीत शनिवारी पार पडला. याच पुलाचा दुसरा नामकरण सोहळा संतश्री प्रसाद महाराज यांच्या हस्ते आज पहाटे नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. एकाच पुलाचे दोनदा नामकरण झाल्याने राजकीय चर्चा चांगलीच रंगली आहे.

जनतेच्‍या भावनांशी खेळू नये
बोरी नदीवरील फरशीवरील दुहेरी मोठ्या पुलाला संत सखाराम महाराज यांच्या नावाचा नामकरण सोहळा दोन वर्षापूर्वीच संतश्री प्रसाद महाराज यांच्या हस्ते व आमदार चौधरींच्या उपस्थितीत करण्यात आला आहे. याबाबत जनतेच्या भावनांशी व श्रद्धेशी खेळू नये, असे प्रसिद्धिपत्रक गटनेते प्रवीण पाठक व नगरसेवक प्रा. अशोक पवार यांनी काढले आहे. यात म्हटले आहे, की नवीन झालेल्या लहान पुलाला दलित व कष्टकऱ्यांचे दैवत व प्रेरणास्थान असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव दिले. यात कोणाचा अवमान करण्याचा हेतू नाही. गांधलीपुरा भागातील पुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नामकरण योग्यच आहे. हा विषय वादाचा व अवमानाचा होऊ शकत नाही. पालिका निवडणुकीत दिशाभूल करून सत्ता हस्तगत करणाऱ्यांनी जनतेच्या मनात विष पसरविण्याचा केविलपणा प्रकार करू नये असेही त्यांनी म्हटले आहे.

पालिकेची तत्‍वतः मान्‍यता
पालिका अधिनियम १९६५ च्या कलम ४९ (२के) अन्वये शहरातील रस्ते, मार्ग, चौक यांना नामकरण व क्रमांक देण्याचे अधिकार कायद्याने पालिकेलाच आहेत. या पार्श्‍वभूमीवर ११ एप्रिल २०१७ ला पालिकेच्या स्थायी समिती सभेत बोरी नदीवरील समाधी स्थळाजवळील पुलास श्री संत सखाराम महाराज पूल असे नामकरण करण्यास तत्वत: मान्यता दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर हा नामकरण सोहळा करण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी दिली आहे. पालिकेच्या ताडेपुरा रस्त्यावरील आयएचएसडीपी घरकूल योजनेस लोकनेते शाहीर अण्णाभाऊ साठे नगर असे नामकरण करण्यात आले आहे. गांधीपुरा भागातील पुलालाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूल असे नामकरण करण्यात आले असल्याचा ठराव करण्यात आला आहे.

Web Title: Two times naming programme of Bori river