आंबटगोड, लालचुटुक स्ट्रॉबेरीने पर्यटक मोहित

आंबटगोड, लालचुटुक स्ट्रॉबेरीने पर्यटक मोहित

वणी - लालगुलाबी रंगाची आंबटगोड स्ट्रॉबेरी म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा स्ट्रॉबेरीचा हंगाम वाढत्या थंडीबरोबरच बहरला असून, लालचुटुक, आरोग्यदायी स्ट्रॉबेरी सप्तशृंगगड, वणी-सापुतारा रस्त्यावर ठिकठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. सुरगाणा, कळवण तालुक्‍यातील घाटमाथ्यावर लाल मातीत पिकणारी लालभडक, लहानमोठी, आंबटगोड स्ट्रॉबेरीची फळे वणी, सप्तशृंगगड व सापुतारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी असून, भाविक व पर्यटकांना मोहित करीत आहे. 

सुरगाण्यातील प्रामुख्याने घाटमाथ्यावरील नागशेवडी, घोडांबे, पोहाळी, सराड, चिखली, शिंदे, हतगड, बोरगाव, घागबारी, लिंगामा भागात, तर कळवणच्या पश्‍चिम भागातील पळसदरचे खोरे, सुकापूर, देवळी कराड, खेकुडे, बोरदैवत, वडापाडातील आदिवासी शेतकरी भात, नागली, मका, भुईमूग, कुळीद, उडीद, दादर, गहू पारंपरिक पिकांसह शास्त्रशुद्ध पद्धतीने स्ट्रॉबेरीची बाग लावत आहेत. पोषक वातावरण, जमिनीची पोत यामुळे या भागात सात-आठ वर्षांपासून स्ट्रॉबेरी लागवडीचे प्रयोग यशस्वी होऊ लागले.

यामुळे दिवसेंदिवस लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. विंटर, एसए कॅमेर ओझा, नादीला, आर-२, आर-१, स्वीट चार्ली आदी प्रकारच्या स्ट्रॉबेरीचे वाण असले, तरी या भागात सेल्वा, राणी, इंटर, नाभियासह कमी दिवसांत लालभडक मोठे फळ देणाऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड अधिक आहे. या वाणांची रोपे शेतकरी प्रामुख्याने महाबळेश्‍वर येथून १५-२५ रुपयांना एक रोप दराने आणतात.

स्ट्रॉबेरीमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या हातात थोड्या फार प्रमाणात पैसा खेळू लागला आहे. मोठे शेतकरी एक-दोन किलोची खोकी भरून मुंबई, सुरत, नवसारी, बिलिमोरा, वघई, भरूच, वासदा येथे पाठवतात. काही शेतकरी जागेवरच व्यावसायिकांना विक्री करतात. बहुतांशी शेतकरी हे स्वतःच वणी, नांदुरी, सप्तशृंगगड, सापुतारा या रस्त्यांवरही ठिकठिकाणी छोटे स्टॉल उभारून स्ट्रॉबेरी विकताना दिसत आहेत.

थंडी ठरतेय उपयुक्त
स्ट्रॉबेरी थंडीत पिकणारे फळ असल्याने त्याचा मुख्य बहर डिसेंबर-जानेवारीत असतो. स्ट्रॉबेरीचे एकूण सहा बहर मिळतात. बहुतांशी शेतकऱ्यांचा दुसरा बहर सुरू आहे. डिसेंबर-जानेवारीत सर्वाधिक स्ट्रॉबेरी विक्रीसाठी येते. सध्या थंडीचे प्रमाण चांगले असल्याने स्ट्रॉबेरी पिकास उपयुक्त ठरत आहे. सध्या स्ट्रॉबेरी आकाराने मोठी व चवीला उत्तम असल्याने मागणी चांगली आहे.

आरोग्यदायी स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरी सेवनामुळे हृदयविकार, मधुमेहावर मात, ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असल्यामुळे थकवा कमी होतो. डोळ्यांना प्रखर प्रकाशापासून दिलासा मिळतो. त्वचेवरील सुरकुत्या कमी करते. तजेलदार होते. स्ट्रॉबेरीतील अँटिऑक्‍सिडेंट, फ्लेवोनॉइड, फोलेट व केम्फेरॉल ही तत्त्वे कर्करोग होण्यास कारणीभूत पेशी नष्ट करतात. तांबड्या रक्तपेशींच्या वाढण्यास मदत, मेदरहित असल्याने वजनावर नियंत्रण मिळविण्यास फायदा होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com