"तापी पाटबंधारे'च्या उपाध्यक्षपदी  कोणत्या आमदारांची वर्णी लागणार? 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 12 जून 2018

"तापी पाटबंधारे'च्या उपाध्यक्षपदी 
कोणत्या आमदारांची वर्णी लागणार? 

"तापी पाटबंधारे'च्या उपाध्यक्षपदी 
कोणत्या आमदारांची वर्णी लागणार? 

जळगाव : राज्यात युती सरकार सत्तेवर आल्यापासून पाटबंधारे विकास महामंडळासह इतर महामंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या रखडल्या होत्या. आज कृष्णा खोरे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदाच्या नियुक्ता जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी कोणत्या आमदारांची वर्णी लागणार याकडे लक्ष आहे. 
राज्यात युती सरकार असताना 1997 मध्ये तत्कालीन पाटबंधारे मंत्री एकनाथ खडसे यांच्या कार्यकाळात राज्यात नद्यांच्या पाण्याच्या सिंचनाच्या नियोजनासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळ, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, गोदावरी मराठवाडा विकास महामंडळ, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ आणि तापी पाटबंधारे विकास महामंडळ स्थापन करण्यात आले. या महामंडळावर त्या-त्या भागातील खासदार,आमदारांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असते. आघाडी सरकारच्या काळात रावेरचे माजी आमदार राजाराम गणू महाजन, तसेच नाशिक जिल्ह्यातील कळवणचे आमदार ए. टी. पवार यांचीही नियुक्ती करण्यात आली होती. 
विद्यमान युती सरकारच्या काळात गेल्या चार वर्षांपासून महामंडळाच्या नियुक्‍त्या रखडल्या आहेत. मात्र सध्या त्या नियुक्ती करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी काही महमंडळाच्या नियुक्‍त्या केल्या आहेत. त्यात कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी खासदार संजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी डॉ सुनील देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

"तापी'वर कोणाची वर्णी 
तापी महामंडळाचे उपाध्यक्षपदही रिक्त आहे. कॉंग्रेस आघाडी सरकार असताना रावेरचे माजी आमदार राजाराम गणू महाजन व कळवणचे आमदार ए. टी. पवार यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावरून आल्यावर या महामंडळाच्या उपाध्यक्षपदाची नियुक्‍त्या जाहीर होण्याची शक्‍यता आहे. यात कोणाची वर्णी लागणार, याकडेच लक्ष आहे. रावेरचे आमदार हरिभाऊ जावळे, विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ व चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.

Web Title: varni