Vidhansabha 2019 : निमित्त जलसंकटाचे; लक्ष्य विधानसभेचे

संजीव निकम
गुरुवार, 6 जून 2019

सध्या मनमाडमधील पाण्याच्या मुद्द्यावर जनजीवन ढवळून निघाले आहे. मनमाडला सुटलेल्या ‘पालखेड’च्या आवर्तनाचे पाणी मधेच झिरपून जाते. तहानलेल्या मनमाडकर जनतेला या प्रश्‍नाची सोडवणूक कोण करतो यापेक्षा तो लवकर मार्गी लागावा, असे स्वाभाविकपणाने वाटत असतानाच हा प्रश्‍न आता अचानक पालकमंत्री गिरीश महाजनांच्या दरबारात गेला.

सध्या मनमाडमधील पाण्याच्या मुद्द्यावर जनजीवन ढवळून निघाले आहे. मनमाडला सुटलेल्या ‘पालखेड’च्या आवर्तनाचे पाणी मधेच झिरपून जाते. तहानलेल्या मनमाडकर जनतेला या प्रश्‍नाची सोडवणूक कोण करतो यापेक्षा तो लवकर मार्गी लागावा, असे स्वाभाविकपणाने वाटत असतानाच हा प्रश्‍न आता अचानक पालकमंत्री गिरीश महाजनांच्या दरबारात गेला.

पालकमंत्र्यांनी पावले उचली खरी. मात्र, जी बैठक त्यांच्या मंत्रालयातल्या दालनात बोलावली आहे त्यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवसेनेच्या वाट्याला असलेला नांदगाव विधानसभा मतदारसंघ भाजपकडे पुन्हा वळविण्यासाठी मनीषा पवार यांचे प्यादे पुढे करत पालकमंत्र्यांनी ही वेगळीच चाल खेळली आहे.

जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार व भाजप नेते रत्नाकर पवार या दांपत्याच्या पत्रानुसार या बैठकीचे संयोजन करण्यात आले आहे. दहा वर्षांपूर्वी मनमाडच्याच पाणीप्रश्‍नाच्या मुद्द्यावर व मतदारसंघातील वर्षानुवर्षांच्या विकासाच्या अनुशेषावर राज्याचे हेवीवेट नेतृत्व असलेल्या छगन भुजबळ यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. परिणामी त्यांचे राजकीय वारसदार म्हणून पंकज भुजबळ यांची विधानसभेतील एन्ट्री सोपी झाली. शिवाय कधीही सलग कुणालाही विधानसभेतील विजय मिळत नसलेल्या नांदगावमधून पुन्हा पंकज भुजबळ यांची लॉटरी लागली.

शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांना दुसऱ्या, तर भाजपचे अद्वय हिरे यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. हिरे यांनी पंधरा दिवसांच्या अवधीतच पन्नास हजार मतांचा पल्ला गाठला, हे त्यातील वैशिट्य म्हणावे लागले. अशा पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. भाजपकडून इच्छुकांची संख्या मोठी असली, तरी प्राधान्यक्रमात मनीषा व रत्नाकर पवार यांच्या नावाच्या चर्चेने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दहा वर्षांपूर्वी छगन भुजबळ पालकमंत्री होते.

सध्या गिरीश महाजन आहेत. अगोदर दुष्काळाच्या निमित्ताने व आता मनमाडच्या पाणीप्रश्‍नावर पालकमंत्र्यांनी चाचपणी सुरू केल्याने वातावरण ढवळून निघाले आहे. आमदार म्हणून पंकज भुजबळ यांच्या जनसंपर्क नसल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीला बॅकफुटवर जावे लागले. त्यातच भूमिपुत्रांच्या भूमिकाच संदिग्ध स्वरूपाच्या असल्याने प्रश्‍नाची सोडवणूक कोण करतो, याला प्राधान्य देत पंकज भुजबळ व सुहास कांदे यांचे नेतृत्व स्वीकारण्यात आले आहे. आता नांदगाव मतदारसंघातील ५६ खेडी असो, अथवा मनमाडच्या पाण्याचा मुद्दा असो, त्याच्या सोडवणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री गिरीश महाजन निमित्त ठरत असल्याने प्रस्थापितांपुढे यापुढे काय, असा कळीचा सवाल उभा राहिला आहे.

पालकमंत्री महाजन यांनी ११ तारखेला त्यांच्या दालनात मनमाडच्या पाणीप्रश्‍नावर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह यंत्रणेची बैठक लावली अन्‌ ती होण्यापूर्वीच वादंग उभे राहू पाहत आहे. आमदार पंकज भुजबळ यांनी अजिबात जनसंपर्क ठेवला नसल्याची किंमत राष्ट्रवादीला चुकवावी लागत आहे. त्यामुळेच चारा छावणीनिमित्ताने मोठ्या भुजबळांनी नांदगाव, मनमाडला जाणीवपूर्वक भेट देत पाहणी केली. 

युतीच्या जागावाटपात नांदगाव मतदारसंघ हा शिवसेनेच्या ताब्यात आहे. तो पुन्हा मिळवत तेथून भाजपचा उमेदवार उभा करण्याचा पालकमंत्र्यांचा डाव असल्याची शंका शिवसेनेच्या गोटात आहे. त्यामुळे ही बैठक वेगळीच चर्चा निर्माण करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Nandgaon Constituency Water Disaster Politics