राज्यातील गावे, पाड्यांचे वर्षभरात विद्युतीकरण - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

नंदुरबार - वर्षानुवर्षे अंधारात असणाऱ्या अतिदुर्गम भागातील सर्व महसुली गाव, पाड्यांमध्ये वर्षभरातच मार्च 2018 पर्यंत विद्युतीकरण केले जाईल. त्यासाठी मध्य प्रदेशकडून वीज खरेदी करण्याचीही सरकारची तयारी आहे. तसेच आदिवासी भागातील आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी आरोग्य विभागाची रिक्त पदे त्वरित भरून अतिदुर्गम भागातील डॉक्‍टरांसाठी मॉडेल निवासस्थानांची उभारणी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मोलगी येथे केली. फडणवीस आज मोलगी व भगदरी (ता. अक्कलकुवा) येथे दौऱ्यावर आले होते. त्यांनी विविध विकासकामांचे भूमिपूजन व विकासकामांची पाहणी केली. त्यानंतर अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. फडणवीस पुढे म्हणाले, की कुपोषणावर मात करण्यासाठी मोलगी येथे युनिसेफच्या माध्यमातून पोषण पुनर्वसन केंद्राचा शुभारंभ केला आहे. त्यात कुपोषित बालकांवर उपचार केला जाईल. आदिवासी भागात अनेक समस्या आहेत, त्या लगेचच सुटणार नाहीत. मात्र अतिदुर्गम भागात डॉक्‍टर उपस्थित राहत नसल्याने आरोग्याचा प्रश्‍न अधिक आहे. तो सोडविण्यासाठी डॉक्‍टरांना मॉडेल निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येईल, जेणेकरून येथे डॉक्‍टर नियमित राहतील. जिल्ह्यात आरोग्य विभागात 1200 पैकी साडेतीनशे विविध पदे रिक्त आहेत, ती भरण्याचा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यांना त्यासाठी विशेष अधिकार दिले आहेत.

आमचूरचे ब्रॅंडिंग व्हावे
फडणवीस म्हणाले, की जलयुक्त शिवारच्या कामांवर शासनाने भर दिला आहे. मागेल त्याला शेततळे योजनेस चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे नवीन वाढीव उद्दिष्ट मंजूर करून प्रत्येकाला शेततळे दिले जाईल. "जलयुक्त'ची वाढीव कामे मंजूर केली जातील. आमचूर उद्योगासाठी येथील आदिवासींनी ब्रॅंडिंग करावे. या उद्योगाला चालना देण्यासाठी रोजगार हमी योजनेतून आमराई तयार करू. तसेच शासनस्तरावर निधीही उपलब्ध करून देऊ. ब्रॅंडिंगमुळे आमचूरला भाव चांगला मिळेल.

Web Title: village wadi electricity in this year