गावोगावी पन्नास रुपयात मिळते फक्त दोनशे लिटर पाणी!

गावोगावी पन्नास रुपयात मिळते फक्त दोनशे लिटर पाणी!

येवला : तालुक्यात पाणी पुरवठ्याची टँकरने शंभरी गाठली आहे मात्र या टँकरद्वारे पुरवठा होणारे पाणी म्हणजे निव्वळ शिंतोडा मारल्यासारखे आहे. या अल्पशा पाण्यावर नागरिकांची गरज भागत नसल्याने आणि वाड्या-वस्त्यांवर तर आठवड्यातून एकदाच शासकीय टँकर येत असल्याने खासगी टँकर चालकांकडून पाणी विकत घेऊन नागरिक गरज भागवत आहेत.

गावोगावी कुठे 50 तर कुठे 60 रुपयात खासगी टँकरवाल्यांकडून अवघे २०० लिटरच पाणी भरून मिळत आहे. हे गणित परवडत नसले तरीही तालुक्यात पाणी विकत घेण्यासाठी दिवसात 70 हजार ते 01 लाखांपर्यत उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे. पाणीदार विहिरीतून 300 ते 400 रुपये टँकरने पाणी विकत असतांना प्रशासन अशा विहिरी अधिग्रहीत करण्यासाठी उदासीन असल्याने हा गोरखधदा जोरात सुरु आहे.
तालुक्यातील 57 गावे आणि 39 वाड्याना आजमितीस टँकरने पाणीपुरवठा होतोय.

गावांमध्ये टँकर आल्यास विहिरीत, सिंटेक्स टाकीत किंवा थेट योजनेला पाणी दिल्यामुळे त्याचे योग्य नियोजन होते. परंतु वाड्यावस्त्यांवर मात्र टँकर ठिकठिकाणी फिरून नागरिकांना दोनशे लिटरचे टीप किंवा थेट हंड्याने पाणी देण्याची वेळ येत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होऊन तक्रारी वाढत आहेत. टंचाईग्रस्त गावात 05 ते 15 पर्यंत वाड्या-वस्त्या असून प्रत्येक ठिकाणी रोजच पाणी मिळत नाही.

500 वर वस्त्या अन अवघ्या 34 खेपा..
नगरसूलला तब्बल 55, सुरेगाव रस्ता 10, राजापूरला 08, सायगावला 05, ममदापुरला 04, खरवडीला 03, तळवाडेला 04, बोकटेला 05,  खामगावला 05, अंगुलगाव 08, कुसमाडी 04 तर उंदीरवाडी, खिर्डीसाठे, पीपळखुटेला, मातुलठाण, भारमला प्रत्येकी 02, अंदरसूल, अनकाई, गोरखनगर, देवदरी, कुसमाडी, खैरगव्हाण, सावरगाव येथे प्रत्येकी एका अश्या छोट्या-मोठ्या 130 वस्तीला दिवसाला टँकरच्या सुमारे 34 खेपा पाणीपुरवठा सुरु आहे. या कागदावर एवढ्याच वस्त्या असल्या तरी प्रत्यक्षात 500 वर छोट्या-मोठ्या वस्त्या असून अनेक ठिकाणी तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच टँकर येत असल्याने मिळालेले थोडेफार पाणी नागरिकांना बचत करून-करून वापरावे लागत आहे. 

पाण्यासाठी भांडणे अन वाद नित्याचेच..
गावोगावी टँकर आला की नागरिकांची पाणी भरण्यासाठी एकच झुंबड उडते, त्यातून भांडणे, किरकोळ वादाचे प्रकारही घडत आहेत. यामुळे पाणीपुरवठा प्रशासन देखील बुचकळ्यात पडले असून पाण्याचे नियोजन करताना अनंत अडचणींचा सामना करण्याची वेळ येत आहे. पाण्याचा एक टॅंकर आणि भरण्यासाठी शेकडो नागरिक...यामुळे प्रत्येकाच्याच वाट्याला शंभर-दोनशे लिटर ही पाणी येत नसल्याने हे पाणी एका दिवसात संपते. त्यामुळे गावोगावी नागरिकांची पाण्याची मागणी वाढल्याने काही खासगी टँकर चालकांनी पाणी उपलब्ध करून ते पन्नास रुपयाला एक टीप (दोनशे लिटर) पाणी विक्री चालविली आहे.

ग्रामीण भागात असे 300 वर खाजगी व्यावसायिक टँकरने टंचाईत नागरिकांना घरपोच पाणी देत आहेत. आठवड्यातून दोन ते तीन वेळेस हे 200 लीटर पाणी विकत घेऊन घरच्या वापरासह जनावरांची तहान भागविण्याचे काम शेतकरी करत आहेत. अधिकाऱ्यांनी पाणी विक्री होणाऱ्या विहिरी अधिग्रहित केल्या तरी नागरिकांना मोठा दिलासा मिळेल पण यासाठी कोणी पुढाकार घेत नसल्याने सर्व गोंधळ सुरु आहे.

दिवसागणिक खाजगी टंकरचे दर वाढत असून हजारांपर्यत दर पोहोचले. जनावरे जगवण्याची कसरत होत असून छावण्याचा निर्णय प्रस्तावित आहे. मात्र आम्ही ग्रामपंचायत मार्फत 38 गाव पाणीपुरवठा योजनेतून पाणी घेऊन नागरिकांना पाणी देणार आहोत.यासाठी भाडोत्री टँकर देखील लावला असल्याचे सचिन कळमकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com