बारागाड्या ओढून मनमाडला खंडोबा यात्रोत्सवास प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

सायंकाळच्या सुमारास मानकऱ्यांनी संबळ, डफाच्या सवाद्य मिरवणुकीने आणि वाघेमुरळीच्या सोबतीने नगरप्रदिक्षणा घालून जुंपलेल्या मानाच्या बारागाड्यांची पूजा केली. या वेळी "येळकोट येळकोट जय मल्हार', "सदानंदाचा येळकोट...'च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता

मनमाड - मनमाडचे ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यांची जत्रा सवाद्य मिरवणुकीने मानाचा घोडा आणि बारागाड्या ओढून पारंपरिक उत्साहात साजरी झाली. भंडाऱ्याच्या उधळणीने परिसर सोनेरी झाला होता.

दरवर्षी माघी पौर्णिमेला येथे श्री खंडेराव महाराज यात्रा होते. पौर्णिमेच्या सात दिवस अगोदर यासाठी तयारी केली जाते. बारागाड्या ओढणारा नवरदेव सात दिवस मंदिरात मानकरी म्हणून असतो. यंदा मानकरी म्हणून वैभव सांगळे हा तरुण होता. आज सकाळपासून भाविकांनी खंडेराव महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात रांगा लावल्या होत्या. विविध खाद्य, वस्तू, बेलभंडाऱ्याची दुकाने रस्त्याच्या दुतर्फा सजली होती. श्री खंडेराव महाराज मंदिरावर विधीवत व पारंपरिक पद्धतीने पंचक्रोशीतील वाघेमंडळीच्या उपस्थितीत हळद लावण्यात आली. सायंकाळच्या सुमारास मानकऱ्यांनी संबळ, डफाच्या सवाद्य मिरवणुकीने आणि वाघेमुरळीच्या सोबतीने नगरप्रदिक्षणा घालून जुंपलेल्या मानाच्या बारागाड्यांची पूजा केली. या वेळी "येळकोट येळकोट जय मल्हार', "सदानंदाचा येळकोट...'च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता.

मानाचा घोडा पुढे व मानकरी असलेल्या नवरदेवाने बारागाड्या ओढताच सर्वत्र भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. सकाळपासून शहर व परिसरातील महिलांनी भरीतभाकरीचा नैवेद्य दाखवीत खंडेरावाची मनोभावे पूजा केली. सायंकाळी घरोघरी तळी भरण्यात आली. सात दिवसांपासून मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. बुधलवाडी येथील श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवासही आज प्रारंभ झाला. गणेश कराड या तरुणाने बारागाड्या ओढल्या. नगराध्यक्षा पद्मावती धात्रक, शिवसेनेचे गटनेते गणेश धात्रक, रवी खोटरे, माजी नगरसेवक बंडूनाना सांगळे, तसेच पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते.

Web Title: villege festival in manmad