दुर्बलता काढल्याशिवाय जिंकणारा समाज निर्माण होणार नाही : विवेक घळसासी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

सलग तेरा वर्ष एकच गाव, एकच व्यासपीठ, एकच वक्ता, एकच सूत्रसंचालक व सलग ४० विविध विषयांवरील व्याख्याने अशी 'वसंत व्याख्यानमाला' चालविणारे (कै.) दादासाहेब वसंतराव दगाजी पाटील चेरीटेबल ट्रस्ट हे बागलाण तालुक्यातील पहिलेच ट्रस्ट ठरले आहे.

सटाणा : मानसिक आणि वैचारिक दुर्बलता काढून टाकल्याशिवाय जिंकणारा समाज निर्माण होणार नाही. समाजातील एखाद्याचे कौशल्य, वीरता सिद्ध करता येण म्हणजे जिंकण होय. ज्या दिवशी ही वीरता सिद्ध होईल तेव्हा त्याच्या पायावर संपूर्ण समाज नतमस्तक होतो, असे प्रतिपादन प्रख्यात प्रकांड पंडित, विद्या वाचस्पती, उद्बोधक आणि ज्येष्ठ विचारक विवेक घळसासी यांनी काल सोमवार (ता. २७) रोजी येथे केले.

येथील सहकारमहर्षी (कै.) दादासाहेब वसंतराव दगाजी पाटील यांच्या १३ व्या पुण्यस्मरणानिमित्त (कै.) दादासाहेब वसंतराव दगाजी पाटील चेरीटेबल ट्रस्टतर्फे दगाजी चित्रमंदिरमध्ये आयोजित वसंत व्याख्यानमालेत 'जिंकणारा समाज घडविण्यासाठी' या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना श्री. घळसासी बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष व जलदूत डॉ. तुषार शेवाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष सुनील मोरे उपस्थित होते. श्री. घळसासी म्हणाले, अनुकूलतेवरच विजयाचे गणित अवलंबून असते. सामाजिकतेच्या भ्रामक कल्पनेतील विकृती माणसाला जिंकू देत नाहीत. पराभूत मानसिकतेतून माणसाने जिंकण्याची इच्छा धारण केली पाहिजे. जिंकणारा समाज निर्माण करताना पहिल्यांदा आपल्या डोक्यात भरलेल्या जाणीवपूर्वक उणीवा टाकून दिल्या पाहिजेत. अस्तित्वाची मशाल पेटवताना आम्ही विकसित होण्यासाठी जन्माला आलो आहोत, असे समाजमन तयार होण्याची गरज आहे. दीड हजार वर्षांपासून आपण अंधाराची चर्चा करत बसलो तर प्रकाशाचे स्वप्न पडणार कधी ? कोणतीही सेवा शोषण नाही. सेवा सामर्थ्याची गोष्ट बनू शकते. मनुष्याला पापाची निर्मिती मानणारे समाज घडवू शकत नाही. त्यासाठी मानसिक, वैचारिक दौर्बल्य फेकून दिले पाहिजे. आज आपण जागे झालो म्हणून पारतंत्र्याच्या शृंखला तोडता येतात. हरणाऱ्यांचे दु:ख लक्षात घेतले तर जिंकणाऱ्या समाजाचे स्वप्न खरे ठरू शकेल. पूर्वी संपूर्ण भारतीय मानसिकता हरणाऱ्यांची होती. विकृतीयुक्त समाज व भेदाभेदांच्या भिंती समाजात उभ्या राहिल्यानेच हरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आपल्या समाजाची विकृती, दुर्बलता शोधत राहिलो तर जिंकण्याचे उत्तर कधीही सापडणार नाही, असेही श्री. घळसासी यांनी स्पष्ट केले.

समाजातील मानसिक संतुलन बिघडलेल्या बेघर, अनाथ, मनोरुग्ण महिलांचे पुनर्वसन व त्यांच्या मुलांना आपले नाव देऊन गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा सांभाळ करणाऱ्या नगर जिल्ह्यातील माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सौ. सुचिता धामणे या दाम्पत्याला श्री. घळसासी व डॉ. तुषार शेवाळे यांच्या हस्ते या वर्षाचा 'वसंत गौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.

कार्यक्रमास द्वारकाबाई पाटील, डॉ. शुभदा माजगावकर, डॉ. सौ. शहा, डॉ. सौ. येवलकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, प्रल्हाद पाटील, कल्याणराव भोसले, बाळासाहेब मराठे, व्ही. डी. सोनवणे, दि. शं. सोनवणे, प्रा. बी. डी. बोरसे, विश्वास चंद्रात्रे, डॉ. विजया पाटील, मनीषा पाटील, अनुराधा मराठे, सरोज चंद्रात्रे, समीर पाटील, प्रा. योगेश पाटील, डॉ. चंद्रसेन पाटील, अंबादास देवरे, देवेंद्र वाघ, शशिकांत कापडणीस, रोशन खैरनार, अभिजित सोनवणे, अजय सोनवणे, कुशल कुलकर्णी, वैभव गांगुर्डे, व्ही. डी. इंगळे, बी. डी. पाटील, उपप्राचार्य सुरेश भामरे, डी. एल. अहिरे, ललित खैरनार, विनायक बच्छाव, डॉ. मनोहर सोनवणे आदींसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. प्रा. जितेंद्र मेतकर यांनी सूत्रसंचालन केले.

माउली सेवा प्रतिष्ठानतर्फे शिंगवे (ता. जि. नगर) येथे बेवारस मनोरुग्ण महिलांसाठी निवासी उपक्रम राबवला जातो. या महिलांना येथे दाखल करून त्यांची सर्व शुश्रूषा व या आजारातून बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. डॉ. राजेंद्र व डॉ. सुचिता धामणे या दाम्पत्याने या कार्याला वाहून घेतले असून, संस्थेत सध्या १५० पेक्षा अधिक बेवारस मनोरुग्ण महिला व काही महिलांची मुलेही आश्रयाला आहेत. संस्थेच्या वतीने आता नगर तालुक्यातच मनगाव येथे बेवारस मनोरुग्ण महिलांसाठी तब्बल ६०० खाटांचा निवासी प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेत रोटरी इंटरनॅशनल या संस्थेने त्यांचा हाँगकाँग येथे आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा ‘द वन इंटरनॅशनल हय़ुमॅनेट्रियन’ पुरस्कार व अमेरिकन दीड लाख डॉलर (सुमारे १ कोटी ५ लाख रुपये) देऊन गौरव केला आहे.

सलग तेरा वर्ष एकच गाव, एकच व्यासपीठ, एकच वक्ता, एकच सूत्रसंचालक व सलग ४० विविध विषयांवरील व्याख्याने अशी 'वसंत व्याख्यानमाला' चालविणारे (कै.) दादासाहेब वसंतराव दगाजी पाटील चेरीटेबल ट्रस्ट हे बागलाण तालुक्यातील पहिलेच ट्रस्ट ठरले आहे.

Web Title: vivek ghalsasi lecture