चार दिवसाआड पुरवठ्याने येवलेकरांच्या नळाला पाचव्या दिवशी पाणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

शहराचा पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावात पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनातून सुमारे ४५ ते ५० दशलक्ष घन फुट पाणी घेऊन साठवले जाते. तलावातील पाणी जलशुद्धीकरण यंत्राद्वारे शुद्ध करून शहराला पुरवठा केला जातो

येवला - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टप्पा क्रमांक दोनच्या योजनेचा साठवण तलावातील पाणी बाष्पीभवनांसह उपसा व वापरामुळे खालवू लागले आहे. यामुळे शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तलावाच्या आजूबाजूच्या पेक्षा ११५ विहिरींचा उपसा थांबविण्यासाठी वीजपुरवठा देखील खंडित करण्यात आला आहे.

शहराचा पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावात पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनातून सुमारे ४५ ते ५० दशलक्ष घन फुट पाणी घेऊन साठवले जाते. तलावातील पाणी जलशुद्धीकरण यंत्राद्वारे शुद्ध करून शहराला पुरवठा केला जातो. यावर्षी धरणात पुरेसे पाणी असल्याने वेळोवेळी तलावात पाणी मिळाले असून यामुळे पाणीबाणी परिस्थिती उद्भवलेली नाही.यामुळे वर्षभर पालिकेला तीन दिवसाड पाणीपुरवठा करणे सुकर झाले होते.

मात्र वाढत्या उष्म्यामुळे पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले असून पुढील आवर्तनाचा विचार करता खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने चार दिवसांत पाणीपुरवठा करण्याचा निर्णय लागू केला आहे. सद्यस्थितीत तलावात २० दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे,एवढे पाणी पुढील पंचवीस दिवस आरामात पुरू शकणार आहे.मात्र दिवसाला ७० लाख लिटर पाणीपुरवठा करावा लागतो. याचा विचार करून बाष्पीभवन व गळतीचे आकडे डोळ्यासमोर घेता आवर्तन मिळेपर्यंत पाणी पुरले जावे,यासाठी चार दिवसाआड पाणी पुरविण्याचा निर्णय घेतल्याचे पाणीपुरवठा विभाग प्रमुख श्री.फागणेकर यांनी सांगितले.

१० मे पर्यत पाणी आवर्तन!
पालखेड कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेले आवर्तन दहा मेच्या दरम्यान मिळणार आहे. मात्र वारेमाप उपसा व प्रचंड बाष्पीभवन विचारात घेऊन उपलब्ध पाणी पुरावे यासाठी एक दिवस वाढविण्यात आला आहे. सोबतच तलावाच्या आजूबाजूला असलेल्या सुमारे ११५ विहिरीचा वीजपुरवठा देखील खंडित करण्यात आला आहे. यामुळे पाणी गळतीवर बंधने येणार असले तरी इतर मार्गाने विहिरींचा पाणी उपसा सुरूच असल्याचेही दिसते.

शहरवासिंयाना नो प्रोब्लेम
तीन,चार,पाच तर कधी सहा दिवसाआड पाणीपुरवठयाची सवय झालेल्या येव्लेकराना उन्हाळात तलाव कोरडा होऊन पाणीच नसल्याने वाटेल तेथून पाणी मिळवण्याचाही अनुभव आहे. यंदा मात्र बरे चित्र असून नियमाने वेळेत पाणी येत असून आगामी दोन-तीन महिनेही पाणी टंचाईची भीती नसल्याने येवलेकर चिंतेत नाही. सध्या चार दिवसाआड पाणी येत असले तरी ते पुरवण्याची सवय अंगवळणी पडल्याने नसल्यापेक्षा आहे हेच बरे आहे म्हणत नो प्रोब्लेम भूमिका व्यक्त होत आहे.

Web Title: water after four days in Yeola