बक्षिसाच्या रकमेतून दिले "वॉटर एटीएम' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

"जनसेवा हीच ईश्वरसेवा' मानून काम करणारे कळमडू (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी व सध्या पुण्यात आय. टी. कंपनीत संगणक अभियंता असलेले गुणवंत सोनवणे यांनी अमेरिकेत मिळालेली बक्षिसाची रक्कम सामाजिक संस्थेला 'वॉटर एटीएम'साठी दिली. यातील एक 'वॉटर एटीएम' कळमडू गावात बसविले जाणार आहे. सोनवणे यांच्या दातृत्वाचे कौतुक होत आहे. 
 

मेहुणबारे (चाळीसगाव) - "जनसेवा हीच ईश्वरसेवा' मानून काम करणारे कळमडू (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी व सध्या पुण्यात आय. टी. कंपनीत संगणक अभियंता असलेले गुणवंत सोनवणे यांनी अमेरिकेत मिळालेली बक्षिसाची रक्कम सामाजिक संस्थेला 'वॉटर एटीएम'साठी दिली. यातील एक 'वॉटर एटीएम' कळमडू गावात बसविले जाणार आहे. सोनवणे यांच्या दातृत्वाचे कौतुक होत आहे. 

कळमडूचे रहिवासी असलेल्या गुणवंत सोनवणे यांना त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मागीलवर्षी अमेरिकेत दहा हजार डॉलरचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले होते. बक्षिसाची ही सर्व रक्कम त्यांनी सेवा संयोग संस्थेला दान दिली. या संस्थेमार्फत पुणे जिल्ह्यासह चाळीसगाव तालुक्‍यातील दोन शाळांमध्ये 'वॉटर एटीएम' बसविले जाणार आहे. सोनवणे हे संगणकीय क्षेत्रात प्रसिद्ध 'एडीपी' कंपनीत नोकरीला आहेत. सुरवातीपासूनच सामाजिक कार्याची आवड असलेल्या सोनवणे यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल त्यांच्या कंपनीने घेतली. कंपनीतर्फे दरवर्षी त्यांच्या जगभरातील सर्व कार्यालयातील सामाजिक कामगिरी करणाऱ्यांची निवड केली जाते. गुणवंत सोनवणे यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची निवड केली होती. 

दहा हजार डॉलर्सचे बक्षीस 
गुणवंत सोनवणे यांना डिसेंबर 2017 मध्ये अमेरिकेत न्यूयॉर्क येथे त्यांच्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून दहा हजार डॉलरचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले होते. ही रक्कम त्यांनी स्वतःसाठी खर्च न करता, समाजासाठी खर्च करण्याचे ठरवले. भारतीय चलनानुसार 6 लाख 81 हजारांची ही रक्कम त्यांनी सेवा सहयोग या पुणे स्थित संस्थेला दिली. सोनवणे यांनी यापूर्वी शाळाशाळांमध्ये स्कूल कीटचे वाटप करण्यासह महिला सबलीकरणावर भर दिलेला आहे. 

तीन "वॉटर एटीएम' बसविणार 
ऍड फाऊंडेशन व सेवा सहयोग यांच्यातर्फे तीन 'वॉटर एटीएम' बसविण्यात येणार आहेत. पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्‍यातील तनपुरेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत 250 लिटर्सचे तर कळमडू येथे एक हजार लिटरचे दोन 'वॉटर एटीएम' बसविण्यात येणार असल्याचे गुणवंत सोनवणे यांनी सांगितले. ज्यामुळे एका महिलेलाही रोजगार उपलब्ध होणार आहे. 

वॉटर 'एटीएम'मुळे जो काही पैसा जमा होईल, तो गरीब मुलांच्या शिक्षणावर खर्च करण्यात येईल. जो मुलगा शाळेत हुशार आहे व शिक्षण घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत, अशा मुलांना हा पैसा कळमडू विकास मंचच्या माध्यमातून देण्यात येईल. 
असे मत  गुणवंत सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केले.

Web Title: 'Water ATM' given by the prize money gunnvant sonawane