भुसावळ स्थानकातील वॉटर पॉइंट बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

एप्रिलपासून स्थानकातील फलाटांवर "वॉटर पॉइंट' सुरू झाल्याने प्रवासी समाधानी झाले. येथे एक, तीन आणि सहा क्रमांकाच्या फलाटावर असे तीन "वॉटर पॉइंट' अप आणि डाउन मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांसाठी सुरू झाले; पण काही दिवसांतच फलाट सहावरील "वॉटर पॉइंट' बंद पडले आहेत

भुसावळ - उन्हाळ्यात प्रवाशांची तहान भागविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने फलाटावर लावण्यात आलेले "वॉटर पॉइंट' "नव्याचे नऊ दिवसां'प्रमाणे सुरू झाले आणि लगेच बंद झाले. यामुळे डाउन मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांना महागड्या भावाने बिसलेरी पाण्याच्या बाटल्या खरेदी कराव्या लागत आहेत. यामुळे "एक रुपयात ग्लासभर आरओ' थंड पाणी देण्याचा मूळ उद्देश मागे पडला आहे.

उन्हाळा आणि त्यामध्ये खानदेशात पारा 45 अशांवर पोहोचतो. अशात रेल्वेगाड्यांमध्ये तहानेने प्रवासी व्याकुळ होतात आणि नाइलाजास्तव चढ्या भावाने विकल्या जाणाऱ्या "आरओ' पाण्याच्या बाटल्या विकत घ्याव्या लागतात. वेंडर व्यावसायिक प्रवाशांच्या अगतिकतेचा गैरफायदा घेऊन कोणतेही पाणी थंड करून वीस आणि प्रसंगी तीस रुपयांना एक लिटरची बाटली विकतात, अशा तक्रारी आहेत.

गर्दी टाळण्यासाठी सुविधा
साधारण आणि स्लीपर वर्गातील प्रवासी उन्हाच्या काहिलीमुळे आधीच त्रस्त झालेला असतो. त्यामुळे तहान भागविण्यासाठी मिळेल त्या भावात थंड पाणी घेण्यावाचून गत्यंतर नसते. स्थानकांमध्ये गाडी थांबते, तेव्हा थंड पाण्याच्या नळांवर प्रवाशांची झुंबड उडते आणि काही गाड्यांना पाच-दहा मिनिटांपेक्षा अधिक थांबा नसल्याने सर्वच प्रवासी नळावरून पाणी भरून घेऊन शकत नाहीत. प्रवाशांची ही सर्व परिस्थिती पाहून रेल्वे प्रशासनाने फलाटांवर "वॉटर पॉइंट' उभारून "एक रुपयात ग्लासभर आरओ थंड पाणी' पुरविण्यासाठी केबिन उभ्या केल्या. या "वॉटर पॉइंट'मध्ये ग्लासभर पाण्यापासून पाच लिटरपर्यंत पाणी मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली.

"डाउन मार्गा'चे प्रवासी त्रस्त
एप्रिलपासून स्थानकातील फलाटांवर "वॉटर पॉइंट' सुरू झाल्याने प्रवासी समाधानी झाले. येथे एक, तीन आणि सहा क्रमांकाच्या फलाटावर असे तीन "वॉटर पॉइंट' अप आणि डाउन मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांसाठी सुरू झाले; पण काही दिवसांतच फलाट सहावरील "वॉटर पॉइंट' बंद पडले आहेत. सहा क्रमांकाच्या फलाटावरून सर्व डाउन मार्गावरील म्हणजे दिल्ली आणि नागपूरकडे जाणाऱ्या गाड्या थांबतात आणि पुढील प्रवासासाठी रवाना होतात; पण "वॉटर पॉइंट' बंद असल्यामुळे ऐन उन्हाळ्यात स्वस्त आणि शुद्ध पाण्यापासून प्रवासी वंचित राहिले आहेत. मनमानी भावाने विकल्या जाणाऱ्या थंड पाण्याच्या बाटल्या घेण्याशिवाय त्यांना पूर्वीपासुन आता पर्याय नाही.

Web Title: Water Point closed in Bhusawal