अभोणेकरांची पाण्यासाठी पायपीट 

दीपक कच्छवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

आम्ही अभोणेकरांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी आजच प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावाला तहसील प्रशासनाची मंजुरी मिळाल्यानंतर तो लगेचच 
प्रांतधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर येथील पाणीप्रश्न सोडविण्यात येईल. 
- कविता पाटील, सरपंच ः कळमडू (ता. चाळीसगाव) 

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : अभोणे (ता. चाळीसगाव) गावात सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पंधरा दिवसांआड केवळ दहाच मिनिटे पाणी मिळत असल्याने सध्याच्या रणरणत्या उन्हात अभोणेकरांची पाण्यासाठी पायपीट होत आहे. पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत असल्याने प्रशासनाने तातडीने योग्य त्या उपाययोजना करून येथील पाणीटंचाई दूर करावी, अशी मागणी होत आहे. 

अभोणे (ता. चाळीसगाव) गावाची लोकसंख्या आठशेच्या जवळपास आहे. सध्या गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली झाल्याने आजूबाजूच्या शेतांमधून पायपीट करीत ग्रामस्थांना पाणी आणावे लागत आहे. अभोणे गाव कळमडू ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणारे असून गावातील विहिरींना जेमतेम पाणी आहे. ग्रामपंचायतीच्या विहिरीत असलेले थोडे फार पाणी पंधरा दिवसांतून केवळ दहा मिनिटे सोडले जाते. या गावातील पाण्याची टंचाई प्रशासनाला दिसत नाही का? असा संतप्त सवाल अभोणेकरांनी उपस्थित केला आहे. 

दोन किलोमीटरची पायपीट 
गावाच्या जवळपास कुठेही पाणी नसल्याने तब्बल दोन किलोमीटर अंतरावर पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. गावाबाहेर ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा करणारी बंदिस्त विहीर असून त्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. गाळ काढण्यासाठी ग्रामपंचायतीला अडचणी येतात. बंदिस्त असल्यामुळे ही विहीर तोडता देखील येत नाही. सध्या या विहिरीचे पाणी पाण्याच्या टाकीत टाकले जात असून तेथे ग्रामस्थांना पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. 

‘गिरणा’चा पाणीपुरवठा करावा 
अभोणे गाव कळमडू गावातील श्रीकृष्ण मंदिरापासून केवळ अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. कळमडू गावात गिरणा धरणातून पाणीपुरवठा होतो. त्यामुळे सध्या कळमडू गावात पाणी टंचाई जाणवत नाही. त्यामुळे तेथून आम्हाला देखील स्वतंत्र पाइपलाइन करून पाणीपुरवठा करावा अशी अशी अभोणेच्या ग्रामस्थांनी केली आहे. येथील भिल्ल वस्तीजवळ एक खाजगी विहीर आहे. त्या विहिरीच्या काठावर उभे राहून महिलांसह ग्रामस्थांना पाणी काढावे लागते. पाणी काढताना एखादे वेळी तोल जाऊन विहिरीत पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अभोणेकरांना रोजच पाणी काढताना मृत्यूशी जणू सामना करावा लागत आहे. 

हातपंपावर चोवीस तासात भरतात दोनच हंडे 
अभोणे गावात दोन हातपंप आहेत. यातील एक बंद आहे. तर दुसरा सुरू असला तरी दिवसभरात त्याला केवळ हंडे पाणी येत असल्याचे ग्रामस्थांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. त्यामुळे दोन हंडे पाणी भरण्यासाठी या हातपंपावर ग्रामस्थांच्या भांड्यांची लांबलचक रांग लागलेली असलते. अजून मे महिना जायचा असल्याने यापेक्षाही गंभीर परिस्थिती होण्याची वाट न पाहता, प्रशासनाने अभोणेकरांची पाण्याची समस्या तातडीने सोडवावी, अशी आर्त मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. 

आम्ही अभोणेकरांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी आजच प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावाला तहसील प्रशासनाची मंजुरी मिळाल्यानंतर तो लगेचच 
प्रांतधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर येथील पाणीप्रश्न सोडविण्यात येईल. 
- कविता पाटील, सरपंच ः कळमडू (ता. चाळीसगाव) 

महिला म्हणतात.... 

पाण्यासाठी रोजंदारी बुडवावी लागते 
सरलाबाई भिल ः आमच्याकडे कुठलेच वाहन नाही. घरात एकटी असल्याने कामाला गेली तरच पोटाला खायला मिळेल, अशी परिस्थिती आहे. सध्या पाण्यासाठी रोजंदारी बुडवावी लागत आहे. एकदा तर विहिरीत पडता पडता मी वाचली होती. कोणाचा तरी जीव गेल्यावर मगच प्रशासनाला जाग येईल का? 

दिवसभर पाण्याचाच विचार असतो 
शोभाबाई निकम : आम्हा महिलांना पाण्यासाठी शेत शिवारात पायपीट करीत जावे लागते. घरात पाणी नसल्याने कोणत्याच कामात चित्त लागत नाही. दिवसभर पाण्याचाच विचार असतो. पाण्यासाठी महिलांचेच जास्त हाल होत असतात. एवढी गंभीर समस्या निर्माण झालेली असताना आमची पाण्याची समस्या कोणीच सोडवत नाही. 

पन्नास रुपये टाकी पाणी विकत घेतो 
लीलाबाई सोनवणे : पाण्यासाठी दररोज पहाटे चारला उठावे लागते. दूरवर जाऊन पाणी आणावे लागते. त्यामुळे गावात कोणी पिण्यासाठी पाणी मागितले तरी देण्याची हिम्मत होत नाही. आम्हाला वापरण्यासाठी देखील पाणी नसल्याने अक्षरशः पन्नास रुपये टाकीप्रमाणे पाणी विकत घ्यावे लागत आहे.

Web Title: water problem in abhone chalisgaon