पाण्यासाठी टाहो फोडूनी सुकला ओला गळा !

दीपक कच्छवा
बुधवार, 15 मे 2019

चाळीसगाव पालिकेच्या रहिपुरी येथील विहिरीवरून आता टँकरचे पाणी आणले जाणार आहे. अंतर जवळ झाल्यानंतर टँकरच्या फेऱ्याही वाढतील. पाणीटंचाई दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पातळीवर आमचे प्रयत्न सुरू आहेत. 
- एस. ए. निकम, ग्रामसेवक ः दस्केबर्डी (ता. चाळीसगाव)

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ‘दुष्काळाच्या झळा लागूनी जळाला शेतमळा, पाण्यासाठी टाहो पोडूनी सुकला ओला गळा....’ या कवितेच्या ओळींचा प्रत्यय दस्केबर्डी (ता. चाळीसगाव) येथील ग्रामस्थांना सध्या येत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी करुनही दखल घेतली जात नसल्याचा अनुभव ग्रामस्थांना येत आहे. या भागातील लिंबू उत्पादक शेतकरी संकटात सापडले असून किमान पिण्याच्या पाण्यासाठी तरी प्रशासनाने अजून टँकर वाढवावे, अशी मागणी होत आहे. 

दस्केबर्डी (ता.चाळीसगाव) येथील महिलांसह ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी परिसरात भटकंती करावी लागत आहे. या भागातील विहिरींची पातळी खालावल्याने जवळच्या शिदवाडी व जामदा येथून पाणी आणावे लागत आहे. दुचाकी किंवा बैलगाडी, सायकल ज्यांच्या घरी आहे त्यांनाच पाणी आणणे शक्य होते. महिलांना सर्वाधिक त्रस होत आहे. 

नोंद तीनची मिळतात दोनच टँकर 
दस्केबर्डी येथे २ मार्चपासून पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहे. दिवसाला २४ हजार लीटर क्षमतेचे दोन टँकर दररोज पाण्याच्या टाक्यांमध्ये टाकले जाते. पाच टँकरचे पाणी जलकुंभात साठविल्यानंतर ग्रामस्थांना पिण्यासाठी पुरवले जाते. टाकीत सोडण्यात येत असलेले पाणी केवळ पंधरा मिनिटे ते देखील पंधरा दिवसांआड मिळते. या संदर्भात पंचायत समितीशी संपर्क साधला असता, दिवसाला तीन टँकर दिले जात असल्याचे सांगण्यात आले. मात्र, ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवसाला दोनच टँकर दिले जात आहे. त्यामुळे एक टँकरचा घोळ दिसून येत आहे. अडीच महिन्यात केवळ अकरा वेळाच दिवसाला टँकरच्या तीन फेऱ्या झाल्याची ग्रामपंचायतीच्या नोंद वहीत नोंद केलेली दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासन दस्केबर्डी गावाला पाणीपुरवठा करण्यात असमर्थ ठरल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. 

विकत घ्यावे लागते पाणी 
दस्केबर्डी परिसरात काही विहिरींना जेमतेम पाणी आहे. मात्र, ज्यांच्या विहिरी आहेत टंचाई भासेल म्हणून भरू देत नाही. जे शेतकरी पाणी भरू देतात, त्यांना विनवण्या कराव्या लागतात. त्यामुळे पन्नास रुपये खर्च करून दोनशे लीटर पाणी येथील ग्रामस्थांना सध्या विकत घ्यावे लागते. पाण्यासाठी दोन ते चार किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याने पाणी विकत घेण्याची वेळ दस्केबर्डीच्या ग्रामस्थांवर आलेली आहे. 

लिंबू उत्पादक शेतकरी संकटात 
दस्केबर्डी परिसरात लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना पोटच्या पोराप्रमाणे जपलेल्या लिंबू बागा पाण्याअभावी जळताना पहावे लागत आहे. असे असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची अद्याप दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पाण्याअभावी जळालेल्या लिंबू बागांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी सध्या होत आहे. दुष्काळाने होरपळलेला लिंबू उत्पादक शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती व्यक्त केली जात असून तालुक्यातील लिंबू उत्पादकांना शासन दिलासा कधी देणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शेतकऱ्यांना टँकरच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. पाण्याअभावी बागा जळत आहे. एकीकडे उत्पादनात झालेली घट तर दुसरीकडे बागा 
जगविण्यासाठी टँकरद्वारे पाणी देण्यासाठी येणारा भरमसाट खर्च यामुळे लिंबू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ज्या बागा जिवंत आहेत, त्यांना वेळेवर पाणी मिळत नसल्यामुळे फळधारणा कमी होऊ लागली आहे. यामुळे त्याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. 

महिला म्हणतात... 
दोन टँकर पुरत नाही 
वंदना सोनवणे (सरपंच ः सरपंच) ः प्रशासनाने आमच्या गावात पाण्याचे टँकर एका दिवसाला तीन दुसऱ्या दिवशी दोन येतील, असे सांगितले होते. प्रत्यक्षात गावात दिवसाला दोनच टँकर पाणी येत आहे. दोन टँकर पाणी पुरत नसल्याने पाण्याची टंचाई लक्षात घेता टँकर प्रशासनाने वाढवावे. 

गिरणा नदीवर विहिर खोदावी 
चंद्रभागाबाई बोरसे (गृहिणी) ः नदीपात्रातील विहिरींना पाणी असते. त्यामुळे गिरणा नदीवर नवीन विहीर खोदून गावात पाइपलाइनद्वारे पाणी आणावे. आम्हा महिलांना पायपीट करून पाणी आणावे लागते. यामुळे शासनाने आमचा पाण्याचा कायमचा प्रश्न सोडवावा. 

पाणीप्रश्‍नाची कोणीच दखल घेत नाही 
अनुसयाबाई जाधव (गृहिणी) ः ग्रामस्थांना पंधरा दिवसाआड पंधरा मिनिटे पाणी मिळत असताना ज्यांच्याकडून अपेक्षा आहे, असे लोकप्रतिनिधी दखलच घेत नाही. ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते विकत पाणी घेतात, आमच्या सारख्या सर्वसामान्यांना महागाईमुळे पाणी विकत घेणे परवडणारे नाही. 

चाळीसगाव पालिकेच्या रहिपुरी येथील विहिरीवरून आता टँकरचे पाणी आणले जाणार आहे. अंतर जवळ झाल्यानंतर टँकरच्या फेऱ्याही वाढतील. पाणीटंचाई दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पातळीवर आमचे प्रयत्न सुरू आहेत. 
- एस. ए. निकम, ग्रामसेवक ः दस्केबर्डी (ता. चाळीसगाव)

Web Title: water problem in Chalisgaon