पाणी समस्येमुळे महिला त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

शिवशक्ती चौक परिसरात पहाटे साडेतीनला कमी दाबाने पाणीपुरवठा

सिडको - प्रभाग २६ मधील शिवशक्ती चौक परिसरात काही महिन्यांपासून रात्री साडेतीनला आणि तोही अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे महिला संतप्त आहेत. पाणीपुरवठ्याची वेळ बदलावी व जास्त दाबाने मुबलक पाणीपुरवठा करावा, अशी मागणी महिलांनी केली. या ज्वलंत समस्येकडे नगरसेवकांनी पाठ फिरविल्याची तक्रारही महिलांनी केली.

त्रिमूर्ती चौकापासून जवळ असलेल्या या भागात विविध भागांतून आलेल्या कामगारांना तसेच महिलांना पाणीपुरवठा रात्री होत असल्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. जवळच असलेल्या पाटीलनगर, त्रिमूर्ती चौक या भागात मुबलक पाणीपुरवठा होतो, पण केवळ शिवशक्ती चौक भागात कमी दाबाने पाणी येते. त्यामुळे महिलांना दिवसभर पाण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते. रात्री साडेतीनला पाणी भरण्यासाठी जाग आली नाही, तर नंतर पाणीच मिळत नाही. त्याशिवाय पाण्याच्या समस्येमुळे पती-पत्नीतही वाद होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. सिडकोतील मोठा भाग प्रभाग २६ मध्ये असताना हा प्रभाग प्रशासकीय कामांसाठी सातपूरला जोडल्यामुळे आमच्या समस्या कोण सोडविणार, असाही प्रश्‍न महिलांनी उपस्थित केला.

या भागासाठी महापालिकेकडून मिळणारा निधी जातो तरी कुठे, असा सवाल काही महिलांनी केला. निवडणुकीपुरते मत मागायला नगरसेवक येतात आणि नंतर गायब होतात असाच अनुभव येत असल्याचे महिलांनी सांगितले. पाण्याच्या टाकीत पाणी जाईल एवढा तरी पाण्याचा दाब असला पाहिजे, असे सांगून या भागात स्थानिक नगरसेवकांनी लक्ष द्यावे व पाणीपुरवठा सुरळीत करावा व पाण्याची वेळ बदलावी, अशी मागणी ललिता पगारे, माया अहिरे, पुष्पावती बच्छाव, शालिनी बोरसे, सुनील खानकरी, रूपाली कोठावदे, रजनी रत्नाकर, आशा गलांडे यांच्यासह अनेक महिलांनी केली.

स्थानिक नगरसेवक व अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे. अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या सोडविण्यासाठी काहीही प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे महिलांना केवळ पाणी भरण्यासाठी रात्री साडेतीनला उठावे लागते. नगरसेवकांकडे तक्रार केल्यास तेही पाहिजे तसे लक्ष देत नाहीत. त्यामुळे सध्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे.
- दादाजी अहिरे, शिवसेना विभागप्रमुख

Web Title: water problem in sidko