पाणीटंचाईची धग स्वतःला पेटवून घेण्यापर्यंत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

शिंदखेडा तालुक्‍यातील पाणी भरण्याच्या वादातून घटना

शिंदखेडा तालुक्‍यातील पाणी भरण्याच्या वादातून घटना
धुळे - जिल्ह्यात सलग चौथ्या वर्षी दुष्काळी स्थिती उद्‌भवली आहे. यंदा मार्चमध्येच तापमानाने उच्चांक गाठल्याने टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांची पाण्यासाठी दाही दिशा वणवण सुरू आहे. प्रशासनाकडून अद्याप उपाययोजना होत नसल्याने टंचाईग्रस्त गावांतील नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याच पाणीटंचाईच्या धगीतून टॅंकरचे पाणी भरताना महिलांमध्ये झालेल्या वादातून एका महिलेने स्वतःला पेटवून घेतले. याप्रकरणी तीन महिलांविरुद्ध नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

दत्ताणे (ता. शिंदखेडा) येथेही दुष्काळामुळे तीव्र पाणीटंचाई उद्‌भवली आहे. यामुळे गावाला टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. गावात टॅंकर येताच पाणी भरण्यासाठी झुंबड उडते. शनिवारी (ता. 1) दुपारी साडेचारच्या सुमारास पाण्याचे टॅंकर येताच पाणी भरण्यासाठी महिलांची झुंबड उडाली. या वेळी भारतीबाई अमोल देसले-पाटील (वय 27, रा. दत्ताणे) यांच्यासह हिराबाई भिल, सुनीता भिल, केसरबाई भिल (सर्व रा. दत्ताणे) यांच्यात पाणी भरण्यावरून वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. हिराबाई भिल हिने घरातून लाकडी काठी आणून भारतीबाई यांना मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर अपमान सहन न झाल्याने भारतीबाई देसले यांनी स्वतःच्या घरात जाऊन रॉकेल अंगावर ओतून पेटवून घेतले. यात भारतीबाई गंभीररीत्या भाजल्या. उपचारासाठी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी हिराबाई भिल, सुनीता भिल, केसरबाई भिल या तिघींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: water shortage dhule district