पाण्याच्या शोधात ग्रामस्थांची रानोमाळ भटकंती

बोदवड - शेत शिवारातून बैलगाडीवरून पाणी आणताना शेतकरी.
बोदवड - शेत शिवारातून बैलगाडीवरून पाणी आणताना शेतकरी.

बोदवड - बोदवड तालुका नेहमीच दुष्काळी समजला जातो. तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानामुळे जलस्रोत आटले आहेत. त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. शहरात १५ दिवसांआड, तर ग्रामीण भागात २० ते २५ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असून, प्रसंगी रोजगारालाही मुकावे लागत आहे. तालुक्यात उद्‌भवलेली टंचाई निवारण्यासाठी ३८ ग्रामपंचायतींसाठी १२ गावांत विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत; तर पाच गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विहीर खोलीकरणासाठी पाच गावांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, तीन गावांमध्ये तातडीच्या पाणीपुरवठा योजनेस मंजुरी देण्यात आली आहे.

तालुक्यात मागील पाच ते सहा वर्षांपासून दुष्काळ असल्याने तसेच तालुक्यात कोणत्याही प्रकारचे नदी, तलाव, धरण वा इतर जिवंत पाण्याचा स्रोत नसल्याने उन्हाळ्यात नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत.

तालुक्यातील ३३ गावांचा पाणीपुरवठा हा ओडीए योजनेवर अवलंबून आहे. ही योजना कालबाह्य असल्याने या वाहिनीत नेहमीच लिकेजसह बिघाडाची डोकेदुखी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नाने ओडीएची नूतनीकरण जलवाहिनी टाकली जात असून, मुक्ताईनगरपासून या जलवाहिनीचे नाडगावपर्यंत काम झाले आहे.

रेल्वे प्रशासनाच्या परवानगीनंतर पुढील काम होणार आहे. शहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा जलवाहिनीची आवश्यकता असून, तसा ठराव नगरपंचायतीने केला आहे. जिल्हा जीवन प्राधिकरणाकडून परवानगी सुद्धा मिळाली आहे.

मात्र, नाशिक विभाग जीवन प्राधिकरणाकडे काम रेंगाळले असल्याचे समजते. प्रत्यक्षात कामकाजाला केव्हा सुरुवात होईल? याची शहरवासीयांना प्रतीक्षा आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात ‘ओडीए’ योजनेंतर्गत पाणीपुरवठा वारंवार खंडीत होत असतो. त्यामुळे तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.

साळशिंगी, चिचखेड प्रगणे, ऐणगाव, वरखेड, लोणवाडी, मनुर खुर्द, धोनखेडा, जामठी, शेलवड, जलचक्र, भानखेडा, गोळेगाव, धानोरी, मानमोडी, पलासखेड, वडजी, चिखली खुर्द या गावांमध्ये पाण्याची समस्या अधिक दिसून आली. उन्हाळा असल्याने पाण्याची नितांत गरज भासत असताना घरातील पाणी साठादेखील संपल्यास ग्रामस्थांना विकतच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे बहुतांश ग्रामस्थ हे शेतातील विहिरींमधून दैनंदिन वापरासाठी पाणी आणत आहे.

वर्षभरात २८ दिवसच पाणी
‘ओडीए’ योजना जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत असल्याने या योजनेवर होणारा खर्च परवडणारा नाही. तसेच ग्रामपंचायतींकडे वीजबिल थकित हे. त्यामुळे शासनाने पाणीपट्टीत वाढत केली आहे. शहरी भागात दरमाणशी ७० ते १३५ लिटरपाणी देणे बंधनकारक आहे. मात्र, बोदवड शहरात वर्षभरात फक्त मोजून २८ दिवसच नळाला पाणी आले. त्यामुळे सध्या तरी ग्रामीण निकषानुसारच शहरवासीयांना माणशी चाळीस लीटर प्रमाणेच पाणीपुरवठा होत आहे.

शहरातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विहिरीतील गाळ काढणे, खोलीकरण करणे तसेच ‘ओडीए’ जलवाहिनीच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. तसेच पाण्याचे स्रोत तपासून शहरात कूपनलिका करण्यात येणार आहे. याद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जाणार आहे.
- चंद्रकांत भोसले, मुख्याधिकारी, बोदवड नगरपंचायत

तालुक्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. यासाठी पंचायत समितीस्तरावरून उपाययोजना राबविल्या जात आहेत. ग्रामपंचायत स्तरावरून टंचाईच्या बाबतीत आलेल्या सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. नवीन काही प्रस्ताव आल्यास त्यांना सुद्धा लागलीच मंजुरी दिली जाईल.
- गणेश पाटील, सभापती, पंचायत समिती, बोदवड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com