हरणबारीच्या आवर्तनामुळे मोसम खोऱ्यातील पाणीटंचाई दूर 

प्रशांत बैरागी 
रविवार, 27 मे 2018

नामपुर (ता.बागलाण) शहरासह मोसम खोऱ्यातील गावांना भेडसावणाऱ्या भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभुमीवर हरणबारी धरणातून पिण्याच्या पाण्यासाठीचे अखेरचे आवर्तन जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांच्या आदेशान्वये सोडण्यात आल्यामुळे नामपूर शहरासह मोसम खोऱ्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. 

नामपूर (जि.नाशिक) - नामपुर (ता.बागलाण) शहरासह मोसम खोऱ्यातील गावांना भेडसावणाऱ्या भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभुमीवर हरणबारी धरणातून पिण्याच्या पाण्यासाठीचे अखेरचे आवर्तन जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांच्या आदेशान्वये सोडण्यात आल्यामुळे नामपूर शहरासह मोसम खोऱ्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. 

बागलाण तालुक्यातील मोसम खोऱ्यातील गावांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभुमीवर हरणबारी धरणातून आवर्तन सोडण्यात यावे, याबाबत बागलाणच्या आमदार दिपिका चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नाशिक येथे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

नामपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच कविता सावंत यांनीही आवर्तन सोडण्याचा ठराव तहसीलदार यांना पाठविला होता. हरणबारी धरणातून मोसमनदी पात्रात यापूर्वी रब्बीसाठी दोनवेळा आवर्तन सोडण्यात आले होते. अखेरचे आवर्तन पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असल्याने बागलाण व मालेगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी हरणबारी धरणातून पाणी सोडल्यामुळे बागलाण व मालेगाव तालुक्यातील सुमारे ८० टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला आहे. ११६६ दशलक्ष घनफूट असलेल्या हरणबारी धरणावर बागलाणसह मालेगाव तालुक्यातील दीडशे गावे अवलंबून आहेत.

मोसमखोऱ्यात गेल्या महिन्यापासून भूजल पातळीत कमालीची घट झाल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. सार्वजनिक पाणीपुरवठा येाजना पाण्याअभावी ठप्प होऊन टँकरद्वारा गावांची तहान भागवावी लागत असे. पाणीटंचाईमुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. जिल्हाधिकारी यांनी धरणात शिल्लक असलेल्या तीनशे बेचाळीस दशलक्ष घनफूट साठ्यापैकी तीनशे दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आल्याचे आमदार दिपिका चव्हाण यांनी सांगितले. या आवर्तनामुळे मुल्हेर, अंतापूर, ताहराबाद, सोमपूर, जायखेडा, आसखेडा, द्याने, नामपूर, अंबासन, वड़नेर खाकुर्ड़ी, अजंग वडेल आदीं मोठ्या गावांना दिलासा मिळाला आहे. हरणबारीच्या आवर्तनामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मोसम नदीपात्रात आवर्तन सोडल्यानंतर येथील बंधाऱ्याच्या फळ्या काढण्यात आल्यामुळे द्याने येथील नागरिकांनी गेल्या सप्ताहांत रास्ता रोको आंदोलन केले होते. फळ्या काढल्याने गावाने संवर्धन केलेली वाळू वाहून जात असल्याची आंदोलनकर्त्यांची प्रमुख तक्रार होती. त्यानंतर दुसऱ्यांच दिवशी बंधाऱ्यावरील फळ्या पूर्ववत करण्यात आल्या. हरणबारीचे आवर्तन हे केवळ पिण्याच्या पाण्यासाठी असल्याने नदीकाठावरील शेतकऱ्यांनी वीज पम्पाच्या सहाय्याने पाण्याची चोरी करु नये. तसेच मोसम नदीपात्रात पाणी आडविण्यासाठी बांध घालून अडथळा निर्माण करु नये, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.

Web Title: water shortage problem solve in haranbari