मनपाचे दुर्लक्ष आणि धुळ्याची पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली 

एल. बी. चौधरी
Saturday, 9 January 2021

जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य टळले असले, तरी धुळ्याला हाच प्रमुख स्रोत आहे.

सोनगीर ः धुळ्याला पाणीपुरवठा करणारी तापी योजनेची जलवाहिनी सोनगीर ते बाभळे दरम्यान जुन्या मुंबई आग्रा महामार्गालगत अनेक दिवसांपासून फुटली असून लाखो लीटर पाणी वाया जात आहे. लवकरच दुरुस्ती न झाल्यास जलवाहिनीला मोठे भगदाड पडून मोठे नुकसान होईल हे स्पष्ट आहे. दरम्यान तापी योजनेची नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम चार महिन्यांपासून ठप्प आहे. 

आवश्य वाचा- धुळे ग्रामीणमध्ये पाच, तर साक्रीत दोन ग्रामपंचायतींवर भगवा 
 

बाभळे ते सोनगीर दरम्यान नेहमीच जलवाहिनी फुटण्याच्या घटना घडतात. परिणामी हजारो लीटर पाणी वाया जाते. जलवाहिनी फुटून पाणी वाया जात आहे. महापालिका प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना न करता तात्पुरती मलमपट्टी केल्याने इकडे पाण्याची नासाडी होत असताना तिकडे धुळेकरांना पाणी मिळत नसल्याने वणवण भटकावे लागते. जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य टळले असले, तरी धुळ्याला हाच प्रमुख स्रोत आहे. सध्या तापी नदी दुथडी भरून वाहत असली तरी नदीच्या पाण्याची ही स्थिती कायम स्वरूपी नाही. त्यामुळे पाणी काटकसरीने वापरणे व उन्हाळ्यात विशेष नियोजन करणे आवश्यक आहे. 

जलवाहिनी २७ वर्ष पूर्वीची 
तापी योजनेचे जलशुद्धीकरण केंद्राचे पाणीपुरवठा कर्मचारी अनेकदा या रस्त्याने जातात त्यांना फुटलेली जलवाहिनी दिसते परंतु लवकर उपाययोजना केली जात नाही. जलवाहिनी टाकून २७ वर्षे झाली असून ती जीर्ण झाली आहे. तिची पाण्याचा दाब सहण्याची क्षमताही कमी झाली आहे. म्हणून ती वारंवार फुटते या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा कर्मचारींची जबाबदारी वाढली असून जलवाहिनीची नियमित तपासणी गरजेचे आहे. 

वाचा- धुळे जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची शंभर जणांवर रंगीत तालीम 
 

नवीन जलवाहिनीचे काम ठप्प - 
तापी नदीच्या सुलवाडे येथून जलवाहिनीद्वारे जामफळ भरून घेणाऱ्या प्रकल्पात धुळ्याला पाणी पुरवठा करणारी तापी योजनेची जलवाहिनी जात असल्याने जामफळ प्रकल्पाला वळसा घालून नवीन जलवाहिनी टाकणे आवश्यक आहे. तसे कामही सुरू झाले होते. मात्र गेल्या चार महिन्यांपासून हे काम बंद पडले आहे. शेतकऱ्यांनी काम बंद पाडले की महानगरपालिकेचे अंतर्गत वादामुळे बंद पडले समजायला मार्ग नाही. मोठ्या प्रमाणात जलवाहिनीचे तुकडे येऊन पडले आहेत. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water supply marathi news dhule municipal corporation neglects neglects water leaks