जळगाव जिल्ह्यात जुलैतही 77 गावांना टॅंकरने पाणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

जळगाव - जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या वीस टक्के पाऊस झाला असून, जुलैचा पहिला आठवडा उलटला तरीही समाधानकारक पाऊस न झाल्याने आजही जिल्ह्यातील 77 गावांमध्ये 60 टॅंकर सुरू आहेत, तर आठ प्रकल्पांमध्ये ठणठणाट आहे.

जळगाव - जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या वीस टक्के पाऊस झाला असून, जुलैचा पहिला आठवडा उलटला तरीही समाधानकारक पाऊस न झाल्याने आजही जिल्ह्यातील 77 गावांमध्ये 60 टॅंकर सुरू आहेत, तर आठ प्रकल्पांमध्ये ठणठणाट आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षी सरासरीच्या केवळ 75 टक्के पाऊस झाला होता. यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागले. जूनअखेर 145 गावांमध्ये 115 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत होता. तुलनेत यंदा टंचाईची गावे कमी झाली आणि टॅंकरच्या संख्येतही घट झाली आहे. विशेषतः बोदवड, पाचोरा, भडगाव या तालुक्‍यांत बऱ्यापैकी पाऊस झाल्याने या ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा बंद केला आहे. त्याचबरोबर 246 गावांमध्ये विहीर अधिग्रहण झाले होते. विहीर अधिग्रहणाचा हक्क 96 ठिकाणी सोडण्यात आला आहे. सध्या 77 गावांमध्ये 60 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

तालुकानिहाय टंचाईग्रस्त गावे अशी :
तालुका - गावे - टॅंकरची संख्या

जळगाव - 3 - 2
जामनेर - 17 - 18
भुसावळ - 2 - 2
मुक्ताईनगर - 2 - 3
चाळीसगाव - 8 - 10
अमळनेर - 29 - 16
पारोळा - 16 - 9

एरंडोल, धरणगाव, चोपडा, बोदवड, पाचोरा, भडगाव या गावांमधील टॅंकर बंद केले आहेत. यावल, रावेरला टॅंकर सुरू नव्हते.

Web Title: water tanker supply to 77 village