आकडे फुगले, पिकेही फुलली पण टंचाईची स्थिती जैसे थे!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

येवला : कधी येणार याची वाट पहायला लावणारा वरुणराजा अखेर शेतकऱ्यांना पावला आणि शेतातील करपलेली पिकेही तरारली. मागील दोन दिवसांतील पावसाने तालुक्यातील सर्व दूरवरची माना टाकलेली पिके हिरवीगार झाली आहे. तर संततधारेने पावसाचे आकडेही फुगले आहे मात्र प्रत्यक्षात टंचाईची परिस्थिती गावोगावी जैसे थेच आहे.

येवला : कधी येणार याची वाट पहायला लावणारा वरुणराजा अखेर शेतकऱ्यांना पावला आणि शेतातील करपलेली पिकेही तरारली. मागील दोन दिवसांतील पावसाने तालुक्यातील सर्व दूरवरची माना टाकलेली पिके हिरवीगार झाली आहे. तर संततधारेने पावसाचे आकडेही फुगले आहे मात्र प्रत्यक्षात टंचाईची परिस्थिती गावोगावी जैसे थेच आहे.

ब्रिटिशकालीन दुष्काळी असलेल्या येवल्याला दरवर्षी पाऊस वैतागून टाकतोच.. कधी पूर्व भागाला तर कधी पश्चिम भागाला त्याची झळ सोसावी लागत आहे.या वर्षी मात्र अख्खा तालुकाच त्याच्या वणव्यात भरडला गेला.तब्बल महिनाभर पावसाने दडी मारल्याने शेतातील खरिपाची पिके पूर्व भागात मोठ्या प्रमाणात करपली आहेत. पश्चिम भागात थोडा अधिक पाऊस असल्याने पिकांनी थोडा तग धरला होता.पण मागील आठवड्यात तर सर्वदूर आता पिकांचे खरे नाही हेच चित्र वाटत होते. अशातच शुक्रवारी दिवस व रात्रभर कमी अधिक प्रमाणात संततधार पावसाने तालुक्याचे दुष्काळी चित्र काही दिवसांसाठी बदललेले आहे.या २४ तासात तब्बल ५९ मिलिमीटर पाऊस झाल्याने शेतातील पिकांना मोठा आधार मिळून सर्वत्र पिके टवटवीत झाली आहेत.विशेषता मरणाच्या उंबरठय़ावरील पिके जगली पण या पावसाची पिकांना सोबत आठवड्याचीच आहे.

उत्पादनात २० ते ४० टक्के नुकसान
पावसाच्या दडीमुळे माळरानावरील व डोंगराळ उत्तर पूर्व भागातील मका,कपाशी,सोयाबीन,बाजरी ही पिके तारुण्यातच लागण्याच्या मरणाच्या दारात गेली.वाढ व फुलोऱ्याच्या वयातच टंचाईचा झटका बसल्याने आता जरी ही पिके हिरवीगार दिसत असली तरी त्यात २० ते ४० टक्क्यांपर्यंत उत्पन्नात घट होणार आहे.पाणी असलेल्या शेतकऱ्यांनी सिंचन सुविधेवर जगवलेली पिके मात्र जोमाने येणार आहे.

सर्वत्र हिरवेगार, प्यायला पाणीच नाही...
तालुक्यात ७७ टक्के पाऊस पडल्याचे आकडे सांगत असले तरी हि नोंद सरींच्या पावसावरील आहे.त्यातच पालखेड कालव्याचे सुटलेले पान्याने आलबेल असल्याचे वाटत आहे.प्रत्यक्षात परिस्थिती बिकट असून तालुक्यातील एकही बंधारा,तलाव भरलेला नाही.गावोगावी विहीरीना अजूनही पाणी उतरलेले नसून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.आजही टंचाईग्रस्त ३१ गावे व १९ वाडयांना १८ टंकरने पाणीपुरवठा सुरु आहे.

येवल्यातील पाऊस ...
मंडळ - शुक्रवारचा पाऊस - एकूण पाऊस
येवला - ५९ - ३३५
अंदरसूल - ६२ - १९१
नगरसूल - ५५ - १६८
पाटोदा - ५७ - २३१
सावरगाव - ६९ - २५९
जळगाव नेऊर - ६० - १५५

Web Title: weather condition in yeola