Dhule News : धुळ्यातील प्लॉट प्रकरणी महिलेची मंत्रालयात आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death news

Dhule News : धुळ्यातील प्लॉट प्रकरणी महिलेची मंत्रालयात आत्महत्या

धुळे : येथील अवधान शिवारातील एमआयडीसी परिसरातील पतीच्या नावे असलेला प्लॉट (Plot) एकाने बनावट कागदपत्रांद्वारे स्वतःच्या नावावर करत बळकावला. (Woman commits suicide in ministry in plot case dhule news)

या प्रकरणात न्याय न मिळाल्याने विधवा महिलेने मुंबईमधील मंत्रालयात विषारी औषध प्राशनकरून आत्महत्या केली. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. शीतल रवींद्र गादेकर (रा. लक्ष्मी हॉटेल, प्लॉट न. १६, एमआयडीसी, धुळे, ह. मु. पुणे) या महिलेचे पती रवींद्र गादेकर यांच्या नावे धुळे एमआयडीसी परिसरात प्लॉट न. १६ आहे.

हा प्लॉट नरेशकुमार माणकचंद मुणोत याने बोगस नोटरी करत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून जबरदस्तीने हडपला असल्याची तक्रार शीतल गादेकर यांनी येथील पोलिस अधीक्षकांसह मोहाडी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षकांकडे आणि मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, प्रादेशिक एमआयडीसी अधिकाऱ्यांकडे केली होती.

ही तक्रार गादेकर यांनी २१ मार्च २०२३ ला केली असली तरीही २०२० पासून शीतल गादेकर या सतत त्यांनी केलेल्या तक्रारीचा पाठपुरावा करीत होत्या. मात्र, तरीही त्यांना याबाबत न्याय न मिळाल्याने त्यांनी २७ मार्चला मंत्रालयात आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी २७ मार्चला मंत्रालयात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

यानंतर शीतल गादेकर यांचा २८ मार्चला मृत्यू झाल्याची माहिती धुळे पोलिसांना प्राप्त झाली. गेल्या तीन वर्षापासून धुळे एमआयडीसीमधील प्लॉटची मालकी मिळण्यासाठी सतत संघर्ष करणाऱ्या शीतल गादेकर यांना जिल्हा प्रशासनासह पोलिस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आपला जीव गमवावा लागल्याचा संतप्त सूर उमटत आहे.

दरम्यान, मुंबईत शवविच्छेदनानंतर शीतल गादेकर यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांनी नकार दिला. यानंतर धुळे येथे गतिमान हालचाली सुरु झाल्या. रात्री मोहाडी पोलिस ठाण्यात संशयित मुनोत व एमआयडीसी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला. नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील येथे तातडीने दाखल झाले.

धुळे जिल्ह्यातील दुसरी घटना

विकास प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नसल्याने शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील वृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांनीही मंत्रालयात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यावेळीही राज्यात भाजप- शिवसेनेचे युती सरकार होते. आता शीतल गादेकर यांनीही मंत्रालयात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे.